Indapur News | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून लवकरच मदत ; कृषिमंत्री भरणे यांच्या उपस्थितीत पंचनामे सुरू

प्रभात वृत्तसेवा
भवानीनगर – इंदापूर तालुक्यामध्ये रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये शेतीचे व घरांचे नुकसान झाले आहे. त्याबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सणसर या ठिकाणी भेट दिली. ओढ्याला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांच्या घराचे नुकसान झाले आहे, त्याची पाहणी करून कृषी विभाग व महसूल विभागाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे व घरांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना शासनाच्या माध्यमातून मदत केली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिले.
यावेळी पाहणी करताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, सध्या ओढ्या नाल्यांना पूर येत आहे. १९ तारखेपर्यंत पाऊस येणार असल्याचा अंदाज दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापली काळजी घेणे गरजेचे आहे. कमी वेळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ही परिस्थिती तालुक्यांमध्ये निर्माण झाली आहे. शेटफळघडे व परिसरामध्ये साधारण १५६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. म्हणजे साधारण सहा इंच पाऊस पडला. त्यामुळे सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
लाकडी नंबर या भागातील पाणी ओढ्यांना येत असल्याने पूरस्थिती निर्माण होत आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील ड्रीप वाहून गेले असून अनेकांच्या घरांचे देखील नुकसान झाले आहे.राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये ४१ लाख ५७ हजार एकर क्षेत्राचे या पावसामुळे नुकसान झाले. त्यामध्ये पशुधन, शेतकरी,अनेक घरे या सर्वांचे नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त झाले आहेत त्यांचे तातडीने पंचनामे करावेत, अशा सूचना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पंचनामे करून शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई दिली जाईल, असे यावेळी भरणे यांनी सांगितले त्याचबरोबर ओढ्याला पूर येऊ नये यासाठी ओढ्यांचे खोलीकरण करणार असून दिवाळीनंतर साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये या ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण पूर्ण होईल त्यामुळे पुढील काळात कोणतेही आपत्ती येऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येणार आहे.मुसळधार पावसाने सणसरच्या ओढ्याला पाणी आले. याही अगोदर अशा प्रकारे ओढ्याला पूर आल्याने या ठिकाणी अनेकांचे घरातील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
काल रात्री मुसळधार पाऊस झाल्याने ओढ्याला पाणी आल्यानंतर सणसर गावचे सरपंच यशवंत पाटील माजी सरपंच पार्थ निंबाळकर तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन अनेकांना मदत केली ही माहिती इंदापूर तालुक्याचे तहसीलदार यांना समजतात तहसीलदार जीवन बनसोडे व गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी देखील आज सकाळी दहा वाजता सणसर या ठिकाणी येऊन येथील ओढ्याला आलेल्या पुरामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीची पाहणी केली तसेच काही नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने त्यांना घरात जेवण बनवणे कठीण झाल्याने भवानीनगर येथील हॉटेल अलंकारचे मालक सोनू नेवसे यांनी ओढ्यालगत असणाऱ्या नागरिकांना सांबर भात देऊन या नागरिकांची मदत केली.
ओढ्याजवळची अतिक्रमणे हटवा..
सणसर या ठिकाणी जो ओढा आहे, त्या ओढ्याला पावसाळ्यामध्ये कायमच मोठ्या प्रमाणात पूर येत असल्याने या ओढ्यालगत असणाऱ्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. त्यांना इतर ठिकाणी स्थलांतर करावे. तरच इथून पुढील काळात ओढ्याला पाणी आल्यास नागरिकांच्या घरातील वस्तूंचे नुकसान होणार नाही व नागरिकांना देखील चांगले जीवन जगता येईल.





