इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेचे नवनिर्वाचीत नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांचा इंदापूर वकील संघटनेच्या वतीने सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. कायदा व प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हा सन्मान करण्यात आला. आपला माणूस, दैव जाणिले कुणी, जय महाराष्ट्र या शब्दांत इंदापूर वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन कदम यांनी नगराध्यक्षांचे अभिनंदन केले. इंदापूर नगरीतील सामान्यांच्या हिताच्या प्रश्नासाठी नगरपालिकेस कायदेशीर मदत आवश्यक असल्यास वकील संघटना सदैव तत्पर असेल, कायद्याच्या चौकटीत राहून शहराच्या विकासाला गती देण्यासाठी वकील संघटना सदैव पाठीशी उभी राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यास उत्तर देताना नगराध्यक्ष भरतशेठ शहा म्हणाले की, वकील संघटनेस नगरपालिकेच्या वतीने आवश्यक सहकार्य जाईल, असे आश्वासन दिले. कायदा, सुव्यवस्था व विकास यांचा समतोल राखत इंदापूर शहराला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यावेळी ॲड. प्रमोद खरात, ॲड. शशीकांत साबळे, ॲड. श्रीकांत करे,ॲड. मुलाणी, ॲड. सय्यद, ॲड. सचिन राऊत यांच्यासह वकिलांचे सहाय्यक लिपिक बाळू कोळी हे उपस्थित होते. या सन्मान सोहळ्यामुळे इंदापूरमध्ये प्रशासन व कायदा क्षेत्रातील समन्वय अधिक दृढ होणार असल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती.