Indapur Crime: मोठा कट उधळला? इंदापुरातून १ पिस्तूल, २ मॅगझीनसह ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त
Indapur Crime: मधोल (बिहार) येथील मोहम्मदकमरूल मन्सुरी याला गोखळीतून अटक; शस्त्रांमागील मूळ हेतू शोधण्याचे पोलिसांचे प्रयत्न.

Indapur Crime – अवैध शस्त्रांच्या बळावर कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांविरोधात इंदापूर पोलिसांनी धडक कारवाई करत एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि दोन मॅगझीनसह संशयिताला जेरबंद केले. या कारवाईत सुमारे ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हे शोध पथकाच्या या कारवाईमुळे बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १) गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार विनोद लोखंडे व लक्ष्मण सूर्यवंशी यांना गोपनीय माहिती मिळाली होती. मोहम्मदकमरूल हलीम मन्सुरी (मूळ रा. मधोल, जि. वैशाली, बिहार, सध्या रा. गोखळी, ता. इंदापूर) हा अवैधरित्या गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीची शहानिशा करून पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सापळा रचला. संशयिताला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि दोन मॅगझीन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांसह मुद्देमालाची किंमत सुमारे ५८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या अवैध शस्त्रांचा वापर नेमका कोणत्या हेतूसाठी केला जाणार होता, तसेच त्यामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याचा सखोल तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश केकाण करीत आहेत.ही यशस्वी कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल,
अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकाण, पोलीस हवालदार संतोष शिंदे, विनोद रासकर तसेच पोलीस अंमलदार विनोद लोखंडे, मोहन आनंदगावकर, लक्ष्मण सूर्यवंशी, योगेश कर्चे, राहुल शिंदे, सौरभ पाटील, सागर क्षीरसागर, अंकुश माने आणि नंदू जाधव यांच्या पथकाने पार पाडली.






