INDA vs SLA : टीम इंडिया बनली चॅम्पियन! श्रीलंकेचा 66 धावांनी उडवला धुव्वा
युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक आणि वादळी फलंदाजीच्या जोरावर भारत 'अ' संघाने तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात (INDA vs SLA) श्रीलंका 'अ' संघाचा ६६ धावांनी पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले आहे.

INDA vs SLA : युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक आणि वादळी फलंदाजीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात (INDA vs SLA) श्रीलंका ‘अ’ संघाचा ६६ धावांनी पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले आहे.
दांबुला येथे खेळवल्या गेलेल्या या अटीतटीच्या सामन्यात (INDA vs SLA) भारताने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात यजमान श्रीलंका संघाचा डाव ३११ धावांवर आटोपला.
वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम
या ऐतिहासिक विजयाचा खरा नायक ठरला तो अवघा १५ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी. वैभवने मैदानात उतरताच श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. त्याने अवघ्या २९ चेंडूंमध्ये ११ गगनचुंबी षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ९४ धावांची विद्ध्वंसक खेळी केली.
या खेळीदरम्यान वैभवने ५० षटकांच्या क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा महाविक्रम आपल्या नावावर केला. त्याने अवघ्या ११ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.
20 वर्षांचा जुना विक्रम मोडीत
यापूर्वी ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम श्रीलंकेच्या कौशल्या वीरारत्नेच्या नावावर होता. वीरारत्नेने २००६ मध्ये रागामा क्रिकेट क्लबकडून खेळताना १२ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. वैभवने आता हा २० वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे.
भारताची विशाल धावसंख्या: कर्णधार तिलक वर्माची साथ
वैभव सूर्यवंशीच्या या तुफानी सुरुवातीनंतर कर्णधार तिलक वर्माने संयमी आणि जबाबदार फलंदाजी करत ६७ धावा केल्या. सलामीवीर प्रियांश आर्याने ३९ धावांचे योगदान दिले, तर अखेरच्या षटकांमध्ये अनुकूल रॉयने अवघ्या १५ चेंडूंत ३९ धावा कुटल्या. यामुळे भारत ‘अ’ संघाने ५० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात ३७७ धावांचा अवाढव्य डोंगर उभा केला.
यश ठाकूर आणि विप्रज निगमची घातक गोलंदाजी
३७८ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका ‘अ’ संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. मात्र, मधल्या फळीत वनुजा साहनने सर्वाधिक ६२ धावा आणि सदिरा समरविक्रमाने ५२ धावा करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताच्या अचूक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा डाव ४७.१ षटकांत ३११ धावांवर आटोपला.
भारताकडून गोलंदाजीत (INDA vs SLA) यश ठाकूर आणि विप्रज निगम यांनी अप्रतिम कामगिरी करत प्रत्येकी ३ बळी घेतले आणि श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. या शानदार विजयासह भारत ‘अ’ संघाने तिरंगी चषकावर आपले नाव कोरले आहे.






