Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीवर मॅच रेफ्रीकडून मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?
आयपीएल स्पर्धेत आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा भारताचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) सध्या एका वेगळ्याच कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Vaibhav Sooryavanshi : आयपीएल स्पर्धेत आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा भारताचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) सध्या एका वेगळ्याच कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भारत ‘ए’ आणि श्रीलंका ‘ए’ संघादरम्यान दांबुला येथे १५ जून रोजी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला.
या मैदानातील गैरवर्तवणुकीप्रकरणी आयसीसी आणि मॅच रेफ्रींनी कठोर पाऊल उचलत वैभव सूर्यवंशीसह (Vaibhav Sooryavanshi) दोन्ही संघांतील प्रमुख खेळाडूंवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सामना संपल्यानंतर झालेल्या या राड्यामुळे क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
हा संपूर्ण वाद भारत ‘ए’ आणि श्रीलंका ‘ए’ यांच्यातील अटीतटीच्या सामन्यादरम्यान घडला. हा सामना थेट ‘सुपर ओव्हर’पर्यंत पोहोचला होता. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंका ‘ए’ संघाने विजय मिळवल्यानंतर मैदानातील वातावरण कमालीचे तापले. विजय साजरा करत असलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंशी भारताचा १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) याची शाब्दिक चकमक झाली. श्रीलंकेचा खेळाडू विशेन हलम्बगे आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील हा वाद इतका वाढला की, दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये मैदानावरच धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले.
मॅच रेफ्री प्रदीप जयप्रकाश यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी वैभव सूर्यवंशी आणि विशेन हलम्बगे या दोघांनाही मैदानात गोंधळ घालणे आणि एकमेकांशी वाद घालणे याप्रकरणी दोषी ठरवले आहे. शिक्षा म्हणून या दोन्ही युवा खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनातून तब्बल ५० टक्के कपात करण्याचा निर्णय रेफ्रींनी घेतला आहे.

श्रीलंकेच्या ड्रेसिंग रूममध्ये भारताची माफी मागण्याची तयारी? डिकवेलाच्या मध्यस्थीनंतर ‘त्या’ लाजीरवाण्या स्लेजिंगवर क्रिकबझचा सर्वात मोठा खुलासा
केवळ या दोघांवरच नाही, तर मैदानावरील खेळाडूंच्या वर्तनावर नियंत्रण न राखू शकल्यामुळे भारत ‘ए’ संघाचा कर्णधार तिलक वर्मा याच्या मॅच फीमधून ३० टक्के दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच, श्रीलंकेचा अनुभवी यष्टिरक्षक निरोशन डिकवेला याच्या मानधनातूनही २० टक्के कपात करण्यात आली आहे.
या संपूर्ण दौऱ्याचा विचार केला तर आयपीएल गाजवणारा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) या मालिकेत बॅटने फारशी कमाल दाखवू शकला नाही. श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर त्याची बॅटिंग पूर्णपणे अपयशी ठरली. त्याने ४ सामन्यांमध्ये केवळ ११७ धावा केल्या. धावा निघत नसतानाच मैदानावर झालेल्या या वादा मुळे त्याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
दरम्यान, या वादावर भारत ‘ए’ संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “या दोन्ही संघांतील खेळाडू तरुण आहेत. मैदानावर जे काही घडले, त्या घटनेतून हे तरुण खेळाडू नक्कीच चांगला बोध घेतील. तसेच, श्रीलंका ‘ए’ संघाच्या खेळाडूंनी देखील मैदानावरील आपल्या वर्तवणुकीचे धडे शिकून घेण्याची गरज आहे.” या कारवाईमुळे आता युवा खेळाडूंना मैदानावर खेळताना आपल्या आक्रमकतेवर नियंत्रण ठेवावे लागणार हे स्पष्ट झाले आहे.





