Mohsin Naqvi : ‘जर भारताने हातमिळवणी केली नाही तर…’, मोहसिन नक्वींनी टीम इंडियाच्या भूमिकेवर सोडले मौन

मोहसिन नक्वी म्हणाले, “जर भारताला खेळभावना जपायची नसेल, तर आम्हीही हात मिळवण्यास उत्सुक नाही,” अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या आशिया चषकादरम्यान भारतीय संघाने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांशी एकता दर्शवण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला होता.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानी गोटात मोठी खळबळ माजली होती. या घटनेनंतर पाकिस्तानने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी केली होती आणि आशिया चषकावर बहिष्काराची धमकीही दिली होती, मात्र आयसीसीने (ICC) त्यांची मागणी फेटाळून लावली.
अंडर-१९ स्पर्धेतही तोच कित्ता –
हा वाद केवळ वरिष्ठ संघापुरता मर्यादित राहिला नाही. नुकत्याच पार पडलेल्या अंडर-१९ आशिया चषकातही भारतीय युवा खेळाडूंनी पाकिस्तानच्या कोणत्याही सदस्याशी हात मिळवला नाही. विशेष म्हणजे, पीसीबी अध्यक्ष मोहसीन नकवी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यासही भारतीय खेळाडूंनी नकार दिला.
ट्रॉफी स्वीकारण्यास नकार आणि राजकीय पडसाद –
आशिया चषक जिंकल्यानंतर भारतीय संघाने मोहसीन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. नकवी हे पीसीबी अध्यक्ष असण्यासोबतच पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत, त्यामुळे भारताने हा निर्णय घेतला. यावर बीसीसीआय आणि भारतीय कर्णधाराने स्पष्ट केले की, “काही गोष्टी खेळभावनेपेक्षाही वर असतात” आणि संघ आपल्या या भूमिकेवर ठाम आहे.
हेही वाचा – BBL 2025 : मैदानावर चुकला काळजाचा ठोका! रौफ-कार्टराइटचा भयानक अपघात थोडक्यात टळला, पाहा थरारक VIDEO
मोहसीन नकवींचे प्रत्युत्तर –
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अंडर-१९ संघासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मोहसीन नकवी म्हणाले, “जर भारताला हात मिळवायचा नसेल, तर पाकिस्तानलाही त्याची कोणतीही ओढ नाही. आदर हा दोन्ही बाजूंनी असायला हवा. खेळ आणि राजकारण वेगळे ठेवले पाहिजे, मात्र भारतीय संघ सातत्याने खेळभावनेचे उल्लंघन करत आहे.”





