IND W vs PAK W : भारताने सलग १२ व्यांदा पाकिस्तानचा उडवला धुव्वा, विश्वचषकात पाचव्यांदा चारली धूळ

IND W vs PAK W India beat Pakistan : भारतीय महिला संघाने आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 मध्ये सलग दुसरा विजय मिळवला आहे. श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर, टीम इंडियाने पाकिस्तानला 88 धावांनी पराभूत करून विजयी घोडदौड सुरू ठेवली. यासह, भारताने सलग 12 व्यांदा पाकिस्तानला पराभूत करून आपला विक्रम कायम ठेवला आहे. विश्वचषकात पाकिस्तान महिला संघावर हा सलग पाचवा विजय आहे.
पाकिस्तान महिला संघाला अद्याप एकदिवसीय सामन्यात टीम इंडियावर विजय मिळवता आलेला नाही. भारताने 247 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तान संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या 26 धावांवर त्यांचे पहिल्या तीन विकेट्स पडल्या. यानंतर सिद्रा अमीन आणि नतालिया परवेझ यांनी चौथ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नतालियाच्या बाद होताच पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली.
सिद्रा अमीनने साकारली 81 धावांची खेळी –
— BCCI Women (@BCCIWomen) October 5, 2025
पाकिस्तानकडून सिद्रा अमीनने 106 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारासह 81 धावांची खेळी केली. नतालिया परवेझने 46 चेंडूत 4 चौकारांसह 33 धावा केल्या, तर यष्टीरक्षक फलंदाज सिद्रा नवाजने 22 चेंडूत 14 धावांची छोटी खेळी केली. याशिवाय कोणतीही फलंदाज मैदानावर टिकू शकले नाहीत. परिणामी, पाकिस्तानचा डाव 43 षटकांत 159 धावांवर आटोपला.
हेही वाचा – Muneeba Ali Run Out : मुनीबा अली MCC च्या नियमांनुसार रनआऊट होती की नाही? नियम काय सांगतो? जाणून घ्या
क्रांति गौडने केली शानदार गोलंदाजी –
भारताकडून क्रांति गौडने 10 षटकांत 3 षटके निर्धाव टाकत केवळ 20 धावांत 3 विकेट्स घेतल्या. तिच्या या अप्रतिम गोलंदाजीमुळे तिला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. क्रांति व्यतिरिक्त दीप्ती शर्मानेही 3 आणि स्नेह राणाने 2 विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी, पाकिस्तानी गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. मात्र, पाकिस्तानच्या खराब फलंदाजीमुळे भारताने हा सामना जिंकला.
भारतीय संघला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश –
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाला पाकिस्तानविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नाही. निर्धारित 50 षटकांत भारतीय संघ 247 धावांवर सर्वबाद झाला. भारतीय डावाची सुरुवात सलामीवीर स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी सावधपणे केली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 54 चेंडूंमध्ये 48 धावांची भागीदारी केली. मात्र, स्मृती मंधाना 23 धावा काढून बाद झाली. यानंतर पाकिस्तानी गोलंदाजांनी नियमित अंतराने भारतीय फलंदाजांना बाद करत डावावर नियंत्रण मिळवले. परिणामी, भारतीय संघाला 250 धावांचा टप्पा गाठता आला नाही.
प्रतिका रावलने 37 चेंडूंमध्ये 5 चौकारांसह 31 धावा केल्या, तर हरलीन देओलने 65 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 1 षटकारासह 46 धावांचे योगदान दिले. जेमिमा रॉड्रिग्सने 37 चेंडूंमध्ये 32 धावा जोडल्या. ऋचा घोषने अखेरच्या टप्प्यात 20 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 35 धावांची खेळी करत डावाला काहीसा आधार दिला.पाकिस्तानच्या गोलंदाजीमध्ये डायना बेगने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर सादिया इकबाल आणि कर्णधार फातिमा सना यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले.





