IND vs SL T20 Series : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का, घातक गोलंदाज झाला संघाबाहेर…

IND vs SL T20 Series : भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. याआधीच श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज दुश्मंत चमीरा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. तो टी-20 तसेच एकदिवसीय मालिकाही खेळू शकणार नाही. श्रीलंकेच्या संघाने अद्याप त्याच्या बदली खेळाडूचे नाव जाहीर केलेले नाही. मात्र, श्रीलंका क्रिकेट बोर्ड लवकरच याबाबत अपडेट देईल.
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, श्रीलंकेचे मुख्य निवडकर्ता उपुल थरंगा म्हणाले, “आम्हाला कालच अहवाल मिळाला की दुश्मंत चमीरा भारताविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत खेळू शकणार नाही. चमीरा मागील महिन्यात श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये सहभागी झाला होता. मात्र पहिल्या काही सामन्यांनंतर दुखापतीमुळे तो उर्वरित स्पर्धेत खेळू शकला नव्हता.”
चमीरा दुखापतीमुळे आधीच संघाबाहेर…
चमीरा यापूर्वीच दुखापतीमुळे श्रीलंकेच्या संघाबाहेर आहे. दुखापतीमुळे तो आशिया चषक आणि टी-20 विश्वचषकातूनही बाहेर गेला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे तो 2023 च्या आशिया कपमधून बाहेर पडला होता. अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या मालिकेतही चमीरा बाहेरच होता.
‘या’ तिघांपैकी एकाला मिळू शकते संधी…
भारताविरुद्धच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका किंवा कसून रंजिता यांना स्थान देऊ शकतो. फर्नांडोने श्रीलंकेसाठी आतापर्यंत 14 कसोटी आणि 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने 3 टी-20 सामनेही खेळले आहेत. मदुशंकाने श्रीलंकेसाठी 23 एकदिवसीय आणि 14 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने 41 विकेट घेतल्या आहेत. टी20 मध्ये 14 विकेट घेतल्या आहेत. तर कसुन रजिता याने 18 कसोटी(55 विकेट),34 एकदिवसीय(43 विकेट) आणि 18 टी-20(17 विकेट) सामने खेळले आहेत.





