IND vs SL 1st ODI : भारत-श्रीलंका वनडे मालिका आजपासून, टी-20 विश्वचषकानंतर रोहित-कोहली प्रथमच उतरणार मैदानात…

IND vs SL 1st ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांची मालिका संपल्यानंतर आता दोन्ही संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून (2 ऑगस्ट) सुरू होणार आहे, ज्यामध्ये मालिकेतील पहिला सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता हा सामना सुरू होईल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची तयारी लक्षात घेता ही मालिका भारत आणि श्रीलंका या दोघांसाठी खूप महत्त्वाची आहे.
अशा परिस्थितीत टीम इंडिया या मालिकेत पूर्ण ताकदीनिशी खेळत आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे, तर स्टार फलंदाज विराट कोहलीही संघाचा एक भाग असणार आहे. याशिवाय एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी करणारे केएल राहुल आणि श्रेयस अय्यर डिसेंबर 2023 नंतर निळ्या जर्सीत दिसणार आहेत. दोघेही टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा भाग नव्हते.अशा स्थितीत टीम इंडिया तिन्ही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करून टी-20 मालिकेप्रमाणे वनडेमध्ये क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल.
‘पंत-राहुल’बाबतचा निर्णय सामन्याच्या दिवशी…
भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, केएल राहुल आणि पंत यांच्यात कोणाला संधी मिळणार याचा निर्णय सामन्याच्या दिवशी घेतला जाईल. ही चांगलीच डोकेदुखी आहे कारण दोघेही मॅचविनिंग खेळाडू आहेत. हार्दिक पांड्या वैयक्तिक कारणांमुळे या मालिकेत खेळत नाहीये. सहाव्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून भारत शिवम दुबे किंवा रियान पराग यापैकी एकाला संधी देऊ शकतो. यात परागचे वर्चस्व दिसते कारण त्याने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही गोलंदाजाची भूमिका चोखपणे बजावली होती. भारतीय गोलंदाजीबदल बोलायचे झाले तर वेगवान गोलंदाजासह फिरकी गोंलदाजही चांगली कामगिरी करत आहेत. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचा फिरकी गोलंदाज म्हणून तर वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.
श्रीलंकेची वेगवान गोलंदाजी कमकुवत…
श्रीलंकेच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर, श्रीलंकेची कमान चरित असलंकाच्या हाती आहे. क्रिकेट श्रीलंकेने टी-20 नंतर एकदिवसीय मालिकेसाठी असलंकाला कर्णधार बनवले आहे. श्रीलंकेच्या संघात अनुभव आणि तरुणाईचे मिश्रण आहे. भारतासमोर आव्हान उभे करायचे असेल तर त्याच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. मधल्या फळीतील फलंदाजांना टी-20 मालिकेत चांगली कामगिरी करता आली नव्हती. चार गोलंदाज अनफिट असल्याने श्रीलंकेची वेगवान गोलंदाजी कमकुवत झाली आहे. दिलशान मदुशंका आणि मथिशा पाथिराना दुखापतग्रस्त झाले आहेत. याशिवाय दुष्मंथा चमीरा आणि नुवान तुषारा आधीच मालिकेतून बाहेर आहेत.
भारताला इतिहास रचण्याची संधी…
भारताने श्रीलंकेविरुद्ध सर्व फॉरमॅटमध्ये त्यांच्या हेड-टू-हेड रेकॉर्डवर पूर्णपणे वर्चस्व राखले आहे आणि आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास लिहिण्यासाठी सज्ज आहे. शुक्रवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी, भारताने श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या 168 एकदिवसीय सामन्यांमध्ये 99 विजय नोंदवले आहेत. संभाव्य विजयासह, भारत एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध 100 एकदिवसीय विजय नोंदवणारा क्रिकेट इतिहासातील पहिला संघ बनेल. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 142 सामन्यांत 96 विजय मिळवले असून या यादीत ते दुसऱ्या तर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या 157 एकदिवसीय सामन्यांमध्ये 93 विजयांसह पाकिस्तान या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
सामन्यावर पावसाचे सावट….
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी कोलंबोमधील हवामानाबद्दल बोलल्यास, सामन्यावर पावसाचे सावट असण्याची शक्यता आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. वेदर डाॅट काॅम (Weather.com) नुसार, शुक्रवारी कोलंबोमध्ये पावसाची 70 टक्के शक्यता आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द होऊ शकतो, तर डिएलएस नियमही या सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. दरम्यान, मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना 4 ऑगस्ट रोजी तर तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना 7 ऑगस्ट रोजी कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवरच दुपारी 2.30 वाजता खेळवला जाईल.
खेळपट्टीचा अहवाल…
आर प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी सामन्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही काळ फलंदाजांना मदत करू शकते. पारंपारिकपणे, जसा खेळ पुढे जाईल तशी खेळपट्टी थोडी संथ होते आणि फिरकी गोलंदाज येथे वर्चस्व गाजवतात. त्यामुळे खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करते. या ठिकाणी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांची विजयाची टक्केवारी 51.61% आहे, तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांची विजयाची टक्केवारी केवळ 38.06% आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
श्रीलंका संघ : चपाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, वानिंदू हसरंगा, महेश तीक्षणा, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराझ, चमिका करुणा, चमिका करुणा, मोहम्मद शिराज मेंडिस, निशान मधुष्का, एशान मलिंगा.





