IND vs SA Test Series : कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहली आफ्रिकेतून परतला भारतात, समोर आलं ‘हे’ कारण…

IND vs SA Test Series, Virat Kohli : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 आणि एकदिवसीय मालिका संपन्न झाली आहे. आता कसोटी मालिका सुरू होणार आहे. पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरला सुरु होणार असून यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. भारताने तीन टी-20 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली त्यानंतर वनडे मालिका 2-1 ने जिंकली आहे. यानंतर आता टेस्ट मालिका सुरु होणार आहे.
भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली कसोटी मालिकेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला होता. मात्र, अचानक वैयक्तीक कारणाने तो मायदेशी परतला आहे. मात्र संपूर्ण प्रकरण काय आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. टीम इंडियासाठी चांगली गोष्ट म्हणजे कोहली लवकरच परतणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या सामन्यातही तो भाग घेणार आहे. कोहलीने तीन दिवसांपूर्वी भारतात येण्याची परवानगी घेतली होती. भारतात परतल्यामुळे तो सरावात सहभागी होऊ शकला नाही.
दरम्यान, विराट कोहली विश्वचषक 2023 नंतर पहिल्यांदाच सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माही कसोटी मालिकेचा एक भाग आहे. या मालिकेसाठी भारताने युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांचाही संघात समावेश केला आहे.
ऋतुराजलाही संधी मिळाली. मात्र दुखापतीमुळे तो बाहेर आहे. इशान किशनलाही स्थान देण्यात आले. मात्र ईशानने या मालिकेतून आपले नाव काढून घेतले होते. त्यामुळे त्याच्या जागी केएस भरतला टीम इंडियात स्थान देण्यात आले आहे.





