Shubman Gill India vs South Africa ODI Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 17 डिसेंबरपासून वनडे मालिका खेळवली जाणार आहे. टीम इंडिया ही मालिका केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेचा भाग नाहीत.
रोहित आणि विराटने वनडे आणि टी-20 फॉरमॅटमधून ब्रेक घेतला आहे. शुभमन गिल देखील या मालिकेचा एक भाग आहे. टीम इंडियाचे भवितव्य बघितले तर गिल खूप मोठा फलंदाज होऊ शकतो, तो संघात आपलं स्थान भक्कम म्हणजेच कायम करू शकतो. त्याबरोबरच विराटचे अनेक विक्रमही मोडू शकतो.
गेल्या चार वर्षात वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीवर नजर टाकली तर कोहली अव्वल स्थानावर आहे. तर शुभमन गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने 50 डावात 2 हजार 338 धावा केल्या आहेत. तर गिलने 44 डावात 2 हजार 271 धावा केल्या आहेत. गिल कोहलीच्या अवघ्या काही धावांनी मागे आहे. गिल हा टीम इंडियाचे भविष्य आहे. सलामीवीर म्हणून त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. येत्या काळात तो 3 नंबरसाठी दावाही करू शकतो.
गिलच्या वनडे कारकिर्दीवर नजर टाकली तर तो प्रभावी ठरला आहे. शुभमनने भारतासाठी 44 वनडे खेळले आहेत. यामध्ये त्याने 6 शतके आणि 13 अर्धशतके केली आहेत. शुभमनने 2 हजार 271 धावा केल्या आहेत. त्याने द्विशतकही झळकावले आहे. शुभमनची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या 208 धावा आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने आतापर्यंत 254 चौकार आणि 52 षटकार मारले आहेत.
शुभमनने अल्पावधीतच अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो 7व्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 2000 धावा करण्याच्या बाबतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. शुभमनने 38 डावातच ही कामगिरी केली आहे.