IND vs SA : ‘तीन पोती गहू विकून आलो होतो…’, सामना रद्द झाल्यानंतर संतापलेल्या चाहत्याचा VIDEO व्हायरल

IND vs SA fans fury reactions video viral : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना बुधवारी लखनौ येथे खेळवला जाणार होता. मात्र, उत्तर भारतात वाढलेल्या प्रचंड धुक्यामुळे सुरक्षेचे कारण देत हा सामना अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे मैदानावर मोठ्या आशेने आलेल्या हजारो क्रिकेट चाहत्यांना एकही चेंडूचा खेळ न पाहता रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. ज्यामुळे चाहते प्रचंड संतापले होते, ज्याचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रात्री ९:२५ वाजता सामना केला रद्द –
लखनौमध्ये धुक्याचे प्रमाण इतके वाढले होते की, मैदानावरील ‘व्हिजिबिलिटी’ (दृश्यमानता) अत्यंत कमी झाली होती. खेळाडूंना समोरील खेळाडू किंवा चेंडू दिसणेही कठीण झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून सामनाधिकारी आणि पंचांनी रात्री ९:२५ वाजता सामना रद्द झाल्याची अधिकृत घोषणा केली. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळाली.
‘गहू विकून तिकीट घेतलं होतं…’- चाहत्याचा संताप
#WATCH | Lucknow, UP: Cricket fans express their disappointment as IND vs SA 4th T20 match gets abandoned without a ball being bowled, due to fog.
A fan says, “I sold three sacks of wheat and came here to watch the match. I want my money back…” pic.twitter.com/tMXf7Xo02Y
— ANI (@ANI) December 17, 2025
सामना रद्द झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. एका चाहत्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने म्हटले की, “मी माझे घरचे तीन पोती गहू विकून या सामन्याचे तिकीट खरेदी केले होते, आता मला माझे पैसे परत हवे आहेत.”
हेही वाचा – Jasprit Bumrah : बुमराहचा विमानतळावर दिसला ‘अँग्री’ अवतार! फोन हिसकावत फॅनला शिकवला धडा, पाहा VIDEO
दुसरीकडे, आग्र्याहून सुमारे ३५० किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या एका चाहत्याने आपला हिरमोड झाल्याचे सांगितले. “आम्ही पहाटेच घरून निघालो होतो, पण इथे आल्यावर सामनाच पाहायला मिळाला नाही,” अशी भावना त्याने व्यक्त केली. अनेक युझर्सनी हा सामना दिवसा का खेळवला नाही, असा सवालही उपस्थित केला आहे.
सध्या टी-२० मालिकेची काय आहे स्थिती?
भारतीय संघ सध्या या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. भारताकडे हा सामना जिंकून मालिका ३-१ ने खिशात घालण्याची सुवर्णसंधी होती, तर दक्षिण आफ्रिकेला मालिका २-२ ने बरोबरीत आणण्याची आशा होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे दोन्ही संघांना या संधीला मुकावे लागले आहे. आता मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.





