IND vs SA : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात आवेश खानची एंट्री ; सेंच्युरियनमधील पराभवानंतर घेतला निर्णय

IND vs SA : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आवेश खानचा दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे, याठिकाणी टीम इंडिया टी-20 आणि एकदिवसीय मालिका संपवून कसोटी मालिका खेळत आहे.
या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियन मैदानावर खेळला गेला, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा एक डाव आणि ३२ धावांनी पराभव केला. आता टीम इंडियाला मालिका गमवायची नसेल तर त्यांना केपटाऊनमध्ये होणारा दुसरा कसोटी सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल.
आवेश खान भारतीय संघात सामील
टीम इंडियाने मोठा निर्णय घेतला असून, वेगवान गोलंदाज आवेश खानचा संघात समावेश केला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसोबत पदार्पण केले होते, परंतु पदार्पण सामना प्रसिद्धसाठी अजिबात चांगला नव्हता. त्याने 20 षटकात 93 धावा दिल्या आणि फक्त 1 बळी घेतला.
जसप्रीत बुमराहशिवाय भारताचा एकही गोलंदाज सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात प्रभावी ठरू शकला नाही. मोहम्मद शमीचाही टीम इंडियाच्या संघात समावेश असला तरी दुखापतीमुळे त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता बीसीसीआयने दुस-या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाच्या संघात मोहम्मद शमीच्या जागी आवेश खानचा समावेश केल्याची पुष्टी केली आहे.
टीम इंडियाचा नवा संघ
27 वर्षीय आवेश खानने 38 प्रथम श्रेणी सामन्यात 22.65 च्या सरासरीने 149 विकेट घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत रोहित शर्माकडे आता दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी आवेश खानच्या रूपाने पर्याय असेल.
टीम इंडियाचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) , प्रसिध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान.





