IND vs PAK : तिलक वर्माने रघु यांच्या पाया पडून जिंकली चाहत्यांची मने! नेमकं काय होतं कारण? पाहा VIDEO

IND vs PAK Tilak Verma and Raghu Video : भारताने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरण होते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आणि संपूर्ण संघाला विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ‘इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द मॅच’ हा खास पुरस्कारही प्रदान करण्यात आला, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिलक वर्मा भारतीय संघाचे थ्रो-डाउन विशेषज्ञ रघु यांच्या पाया पडताना दिसला. त्याने असे का केले? जाणून घेऊया.
तिलक रघु यांच्या पाया का पडला?
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ‘इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द मॅच’ हा पुरस्कार देण्याची जबाबदारी रघु यांच्यावर सोपवली. पुरस्कार देण्यापूर्वी रघु यांनी एक प्रेरणादायी भाषण केले. रघु म्हणाले, “सर्वांना राम-राम. प्रतिभा ही ईश्वरप्रदत्त आहे, त्यामुळे नेहमी नम्र राहा. प्रसिद्धी तुम्हाला लोकांनी दिली आहे, त्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहा. एकाग्रता ही स्वतःकडून मिळते, तिची काळजी घ्या. प्रेरणा ही कायम राहत नाही, पण शिस्त ही नेहमी तुमच्यासोबत असते. कोणताही खेळाडू परिपूर्ण नसतो, त्यामुळे नेहमी शिकत राहा आणि पुढे जा.”
View this post on Instagram
या प्रेरणादायी भाषणानंतर रघु यांनी तिलक वर्माला पुरस्कारासाठी बोलावले. पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी तिलकने रघु यांचा आदर व्यक्त करण्यासाठी त्यांच्या पाया पडला. विशेष म्हणजे, रघु हे भारतीय संघाचे थ्रो-डाउन विशेषज्ञ असून, अनेकदा ड्यूमुळे ओलसर झालेले खेळाडूंचे बूट स्वच्छ करताना दिसतात. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांच्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले, पण तिलक वर्मानेही या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली.
हेही वाचा – IND vs PAK : अभिषेक शर्माकडून शाहीन आफ्रिदीचे गर्वहरण! ७० सामन्यांचा अभिमान एका षटकारात नष्ट, पाहा VIDEO
तिलक वर्माची शानदार फलंदाजी –
डावखुरा फलंदाज तिलकने अवघ्या 19 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या, ज्यात 2 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. तिलकच्या फलंदाजीमुळे भारतीय संघाला संतुलन मिळाले आणि त्यामुळेच भारताने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला दोनदा पराभूत केले आहे. लीग स्टेजच्या सामन्यात भारताने 7 गडी राखून विजय मिळवला, तर सुपर फोर फेरीत 6 गडी राखून विजय मिळवला.
हेही वाचा – IND vs PAK : गौतम गंभीरच्या निर्देशाने IND vs PAK सामन्यात नवा वाद, हस्तांदोलनावरुन खळबळ! पाहा VIDEO
व्हायरल व्हिडिओ आणि संघाची एकजूट –
बीसीसीआयच्या या व्हिडीओने चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. तिलक वर्माने रघु यांच्या पाया पडून भारतीय संस्कृतीतील आदर आणि नम्रतेचे दर्शन घडवले. रघु यांच्या प्रेरणादायी भाषणाने आणि तिलकच्या कामगिरीने भारतीय संघातील एकजूट आणि शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.





