IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी तणाव! दोन्ही कर्णधारांनी ना हात मिळवला, ना भिडवली नजर

IND vs PAK Suryakumar Yadav Video : टी-20 आशिया चषक 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना आज रंगत आहे. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही कर्णधारांनी आपल्या मागील सामन्यातील खेळाडूंमध्ये कोणताही बदल न करता त्यांच संघासह खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळचा दोन्ही कर्णधारांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
टॉसवेळी कर्णधारांनी केले नाही हस्तांदोलन –
टॉससाठी मैदानात उतरलेले भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आघा यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. विशेष म्हणजे, दोन्ही कर्णधारांनी एकमेकांशी हस्तांदोलनही केले नाही. सूर्यकुमार यादवने सलमान अली आघाला पूर्णपणे दुर्लक्षित केल्याचे दिसून आले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Coin falls in favour of Pakistan and they choose to bat first 🏏
Watch #INDvPAK LIVE NOW on the Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #DPWorldAsiaCup2025 pic.twitter.com/IU98kUSWda
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 14, 2025
भारताचे पाकिस्तानविरुद्ध टी-२० मध्ये वर्चस्व –
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 13 सामने खेळले गेले असून, त्यापैकी 10 सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे, तर केवळ 3 सामन्यांत पाकिस्तानला यश मिळाले आहे. त्यामुळे टी-20 क्रिकेटमध्ये भारताचे पाकिस्तानवर वर्चस्व आहे.
हेही वाचा – IND vs PAK : पाकिस्तानने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय! पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
दोन्ही संघांनी दिलीय विजयी सलामी –
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी या स्पर्धेतील आपले पहिले सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांना 9 गडी राखून पराभूत केले होते. यावेळी कुलदीप यादव, शिवम दुबे आणि अभिषेक शर्मा यांनी दमदार कामगिरी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दुसरीकडे, पाकिस्तानने आपल्या पहिल्या सामन्यात ओमानचा 93 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे दोन्ही संघांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.





