IND vs OMA : सॅमसनच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताचा निसटता विजय, ओमानच्या कलीम-मिर्झाच्या खेळीने वेधलं लक्ष

IND vs OMA India beat Oman in Asia Cup 2025 : आशिया कप 2025 च्या आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने ओमानविरुद्ध 21 धावांनी विजय मिळवत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. अबुधाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 188 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात ओमानच्या फलंदाजांनी दमदार खेळ दाखवत सर्वांचे लक्ष वेधले, परंतु 20 षटकांत 4 गडी गमावून त्यांनी 167 धावांपर्यंत मजल मारता आली.
सॅमसन-अभिषेकचे दमदार प्रदर्शन –
भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शुबमन गिल पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि अवघ्या 5 धावांवर बाद झाला. मात्र, अभिषेक शर्माने आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजी करत 15 चेंडूत 38 धावांची खणखणीत खेळी केली, ज्यात 2 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. संजू सॅमसननेही 45 चेंडूत 56 धावांचा मोलाचा वाटा उचलला. मधल्या फळीत अक्षर पटेलने 26 आणि तिलक वर्माने 29 धावांचे योगदान दिले, तर हार्दिक पंड्याला केवळ 1 धाव काढता आली. भारताने ओमानसमोर 189 धावांचे आव्हान ठेवले.
कलीम-मिर्झाने साकारली झुंजार अर्धशतकं –
For his brisk half-century to power #TeamIndia to 188/8, Sanju Samson bagged the Player of the Match award as India won the match by 21 runs. 👍👍
Scorecard ▶️ https://t.co/XAsd5MHdx4#INDvOMA | #AsiaCup2025 | @IamSanjuSamson pic.twitter.com/6qp6n10ILs
— BCCI (@BCCI) September 19, 2025
ओमानच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजीवर आक्रमक फटकेबाजी केली. 43 वर्षीय आमिर कलीमने सर्वाधिक 64 धावांची खेळी करत सर्वांचे मन जिंकले. हमाद मिर्झाने 33 चेंडूत 51 धावा फटकावल्या, तर जतिंदर सिंगने 33 चेंडूत 32 धावा जोडल्या. ओमानच्या सलामीवीरांनी पहिल्या गड्यासाठी 56 धावांची भागीदारी केली, तर कलीम आणि मिर्झा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 149 धावांपर्यंत मजल मारली. मात्र, शेवटच्या षटकांत भारताला आपल्या अनुभवाचा फायदा झाला आणि ओमानला विजयापासून रोखण्यात यश आले.
हेही वाचा – IND vs OMA : संजूचा शॉट हार्दिकसाठी ठरला ‘दुर्दैवी’, फक्त पाहतच राहिला पंड्या! VIDEO व्हायरल
भारताची गोलंदाजी राहिली सामान्य –
भारताची गोलंदाजी या सामन्यात फारशी प्रभावी ठरली नाही. हार्दिक पंड्याने 4 षटकांत केवळ 26 धावा देत एक गडी टिपला, पण अर्शदीप सिंग आणि शिवम दुबे यांची चांगलीच धुलाई झाली. मागील दोन सामन्यांत नायक ठरलेला कुलदीप यादव यंदा सामान्य कामगिरी करू शकला. हार्दिक, अर्शदीप, हर्षित राणा आणि कुलदीप यांना प्रत्येकी एक गडी बाद केला. मात्र, हार्दिक पंड्याने सीमा रेषेवर जबरदस्त झेल घेत सामन्याला कलाटणी दिली.
हेही वाचा – Jiten Ramanandi : कोण आहे जितेन रामानंदी?ज्याने एकाच षटकात अभिषेक-हार्दिला दाखवला तंबूचा रस्ता
भारताची विजयी घोडदौड कायम –
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया कप 2025 मध्ये ग्रुप ए मधील तिन्ही सामने जिंकले आहेत. यापूर्वी भारताने युएईविरुद्ध 9 गडी राखून आणि पाकिस्तानविरुद्ध 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवले होते. या विजयासह भारताने साखळी फेरीत आपले वर्चस्व कायम राखले आहे. आता भारताचा पुढील सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रविवारी होणार आहे.





