IND vs NZ 1st ODI : टीम इंडियानं विश्वविजेत्यांना केलं चितपट, 59 धावांनी विजय मिळवत विश्वचषकातील पराभवाचा घेतला बदला…

India Women vs New Zealand Women ODI Match : भारतीय महिला क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 59 धावांनी पराभव केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 228 धावांचे लक्ष्य ठेवले होते, पण प्रत्युत्तरात किवी संघ केवळ 168 धावाच करू शकला. अष्टपैलू दीप्ती शर्मानं भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले त्यामुळे ती सामन्याची मानकरी ठरली.
India sneak in with a brilliant bowling and fielding effort to snatch the first game of the series 🇮🇳#INDvNZ pic.twitter.com/AEJ8QYUrne
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 24, 2024
या सामन्यात हरमनप्रीत कौर खेळत नव्हती, त्यामुळे स्मृती मानधना भारताचे नेतृत्व करत होती. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधना केवळ 5 धावा करून बाद झाल्यामुळे संघाची सुरुवात खूपच खराब झाली, तर शेफाली वर्माने 22 चेंडूत 33 धावा तडकावल्या पण या धावसंख्येचे मोठ्या डावात रूपांतर करू शकली नाही. विकेटकीपर फलंदाज यास्तिका भाटियाने 37 आणि जेमिमाह रॉड्रिग्जने 35 धावांचे योगदान दिले.
त्यानंतर एक बाजू लावून धरणारी तेजल देखील 42 धावा करून परातल्यानंतर दीप्ती शर्माने सामन्याची सूत्रे हाती घेताना किल्ला लढवायला सुरुवात केली. मात्र तिला तळाच्या फलंदाजाकडून तिला विशेष साथ मिळाली नाही. दीप्ती शर्मा 41 धावांवर बाद होण्यासोबतच भारताचा डाव संपुष्टात आला. भारताला पूर्ण 50 षटकेही खेळता आली नाहीत आणि 45व्या षटकातच संपूर्ण संघ 227 धावा करून सर्वबाद झाला. अमेलिया केरने गोलंदाजीत सर्वाधिक 4 बळी घेतले तर जेस केरने 3, इडन कार्सनने 2 तर सुझी बेट्सने 1 गडी बाद केला.
टीम इंडियाने गोलंदाजीमध्येही चांगली सुरुवात केली कारण 46 धावांपर्यंत किवी संघाने पहिले तीन विकेट गमावले होते. अहमदाबादच्या खेळपट्टीवर दोन्ही संघ फलंदाजीत संघर्ष करताना दिसले आणि संपूर्ण सामन्यात एकाही खेळाडूला अर्धशतकही झळकावता आले नाही. न्यूझीलंडकडून सर्वाधिक 39 धावा ब्रूक हॅलिडे हिने केल्या. किवी संघासाठी, अमेलिया केरने फलंदाजीत 25 धावांची नाबाद खेळी केली, परंतु ती आपल्या संघाला 59 धावांच्या पराभवापासून वाचवू शकली नाही.
भारताकडून राधा यादवने भेदक गोलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या. तिनं लॉरेन डाउन, जेस केर व मॉली पेनफोल्डला बाद करताना संघाला मोठे यश मिळवून दिले. सायमा ठाकोरने 2 तर दीप्ती शर्मा व अरुंधती रेड्डी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
विश्वचषकातील पराभवाची केली परतफेड….
दरम्यान, नुकत्याच संपलेल्या महिला टी-20 विश्वचषक 2024मध्ये न्यूझीलंड चॅम्पियन बनला होता, तर टीम इंडियाला बाद फेरीतही प्रवेश करता आला नाही. खरं तर, ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडकडून 58 धावांनी पराभव झाला होता आणि नंतर हा पराभव टीम इंडियासाठी जड ठरला.





