IND vs NZ : नव्या वर्षाचा नवा धमाका! विराटच्या ९३ धावा अन् केएल राहुलचा ‘फिनिशिंग टच’; भारताची न्यूझीलंडवर मात

IND vs NZ India beat New Zealand : टीम इंडियाने नवीन वर्षाची सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाने केली आहे. वडोदराच्या नवीन कोटाम्बी स्टेडियमवर पहिल्यांदाच खेळताना भारताने पहिल्या वनडे न्यूझीलंडला ४ विकेट्सने हरवून सुरुवात संस्मरणीय केली. जवळजवळ १५ वर्षांनी वडोदराला परतलेल्या टीम इंडियाने विराट कोहलीच्या शानदार फलंदाजीमुळे पुन्हा एकदा ३०१ धावांचे लक्ष्य गाठले आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
या सामन्यात विराट कोहलीचे शतक अवघ्या ७ धावांनी हुकले, परंतु त्याने विजयाचा पाया रचला. दरम्यान, मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा यांनी न्यूझीलंडला उच्चांकी धावसंख्या गाठण्यापासून रोखले. न्यूझीलंडने डॅरिल मिचेलच्या ८४ धावांच्या जोरावर ३०१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ४९ षटकांत ६ विकेट्स गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला. शेवटच्या क्षणी केएल राहुलने फिनिंश टच दिला.
किव्हींची दमदार सुरुवात अन् सिराजचे पुनरागमन –
Prevailing in a thriller! 👏
A victory by 4⃣ wickets for #TeamIndia to take a 1⃣-0⃣ lead in the three-match series 🥳
Scorecard ▶️ https://t.co/OcIPHEpvjr#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/1pT7kPjsU3
— BCCI (@BCCI) January 11, 2026
प्रथम फलंदाजी करताना हेन्री निकोल्स आणि डेव्हन कॉनवे या सलामी जोडीने भारतीय गोलंदाजांना चांगलेच दमवले. या दोघांनी २१ षटकांत ११७ धावांची सलामी दिली. अखेर हर्षित राणाने ही जोडी फोडली आणि भारताचे सामन्यात पुनरागमन झाले. दुसऱ्या बाजूने डॅरिल मिचेलने नांगर टाकत ८४ धावांची खेळी केली, मात्र तो शतकापासून मुकला.
शेवटच्या षटकांत न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाची धावसंख्या ३०० पर्यंत पोहोचवली. भारताकडून सिराज, हर्षित आणि प्रसिद्ध यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. विशेषतः सिराजने ८ षटकांत केवळ ४० धावा देत प्रभावी मारा केला.
विराट कोहलीचा विक्रम अन् दुर्दैवी ‘नर्व्हस ९०’ –
३०१ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने २ षटकार खेचत आक्रमक सुरुवात केली, पण तो मोठी खेळी करू शकला नाही. शुबमन गिल संथ गतीने खेळत असताना विराट कोहलीने मैदानात उतरताच चौफेर फटकेबाजी सुरू केली. याच खेळीदरम्यान विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील २८,००० धावांचा टप्पा ओलांडून इतिहास रचला. विराट आणि गिलने दुसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. गिल बाद झाल्यावर विराटने श्रेयस अय्यरच्या सोबतीने डाव पुढे नेला. मात्र, वैयक्तिक ९३ धावांवर असताना तो काईल जेमीसनचा शिकार ठरला आणि त्याचे शतक अवघ्या ७ धावांनी हुकले.
हेही वाचा – Virat Kohli Record : ‘किंग’ कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा वर्ल्डरेकॉर्ड! कुमार संगकारालाही टाकलं मागे
केएल राहुल ठरला संकटमोचक
विराट बाद झाल्यानंतर जेमीसनने आणखी दोन झटके दिल्यामुळे भारत अडचणीत आला होता. अशा वेळी केएल राहुल आणि हर्षित राणा यांनी ३७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत सामन्याचे पारडे पुन्हा भारताच्या बाजूने झुकवले. केएल राहुलने शेवटच्या टप्प्यात शानदार षटकार खेचत ४९ व्या षटकात भारताला विजय मिळवून दिला.





