IND vs NZ Final : अभिषेक-संजूचा ‘रुद्रावतार’! विश्वचषकाच्या फायनलमध्ये मोडला १७ वर्षांपूर्वीचा विक्रम; किवींची उडाली दाणादाण
IND vs NZ Final : अभिषेक आणि संजू सॅमसन या जोडीने पहिल्या विकेटसाठी ५० हून अधिक धावांची भागीदारी करत विश्वचषकाच्या फायनलमधील १७ वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडीत काढला.

IND vs NZ Final Abhishek Sharma Sanju Samson create history: टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने वादळी सुरुवात केली आहे. संपूर्ण स्पर्धेत धावांच्या शोधात असलेल्या अभिषेक शर्माने सर्वात मोठ्या व्यासपीठावर आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली. अभिषेक आणि संजू सॅमसन या जोडीने पहिल्या विकेटसाठी ५० हून अधिक धावांची भागीदारी करत विश्वचषकाच्या फायनलमधील १७ वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडीत काढला.
१७ वर्षांचा विक्रम इतिहासजमा –
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही संघाच्या सलामीवीरांना फायनलमध्ये ५० धावांची भागीदारी करता आली नव्हती. २००९ मध्ये पाकिस्तानच्या कामरान अकमल आणि शाहजेब हसन यांनी श्रीलंकेविरुद्ध ४८ धावांची भागीदारी केली होती. आज अभिषेक आणि संजूने हा १७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत नवा कीर्तिमान प्रस्थापित केला आहे.
नॉकआउटमधील सर्वात वेगवान अर्धशतक –
Going BIG early on! 🚀
Abhishek Sharma and Sanju Samson's 𝗽𝗼𝘄𝗲𝗿 play! 💪
Updates ▶️ https://t.co/5LXBod8bl1#TeamIndia | #T20WorldCup | #MenInBlue | #Final | #INDvNZ | @OfficialAbhi04 | @IamSanjuSamson pic.twitter.com/CM4X0M5dog
— BCCI (@BCCI) March 8, 2026
अभिषेक शर्माने फायनलच्या दडपणाला झुगारून देत अवघ्या १८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे टी-२० विश्वचषकाच्या नॉकआउट (उपांत्य आणि अंतिम फेरी) इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. त्याने न्यूझीलंडच्या फिन ऍलन आणि इंग्लंडच्या जॅकब बेथेल यांचा रेकॉर्ड मोडीत काढला. तसेच, या स्पर्धेतील हे सर्वात वेगवान वैयक्तिक अर्धशतक देखील ठरले आहे. त्याने २१ चेंडूंत ५२ धावांचे योगदान देताना ६ चौकार आणि ३ षटकार खेचले. त्याचबरोबर संजू सॅमसनने ४६ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकार ठोकत ८९ धावांचे योगदान दिले.
पॉवरप्लेमध्ये धावांचा डोंगर –
भारतीय संघाने अवघ्या ४ षटकात ५० धावांचा टप्पा ओलांडला, जो विश्वचषकाच्या बाद फेरीतील सर्वात वेगवान टप्पा आहे. पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये भारताने एकही गडी न गमावता ९२ धावा कुटल्या आहेत. यानंतर अभिषेक शर्मा संघाची धावसंख्या ९८ धावा असताना बाद झाला. या तुफानी सुरुवातीमुळे टीम इंडिया आता बोर्डावर एक अजस्त्र धावसंख्या उभारण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे यानंतर भारतीय संघाने १५ षटकांतच २०० धावांचा टप्पा पार केला.





