IND vs NZ 3rd ODI : मंधानाचे धमाकेदार शतक, तिसऱ्या सामन्यासह टीम इंडियाचा 2-1 ने मालिकेवर कब्जा…

IND vs NZ 3rd ODI Match Result : भारतीय महिला संघ आणि न्यूझीलंड महिला संघ यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघाने शानदार विजयाची नोंद केली. मंगळवारी झालेल्या सामन्यात यजमान भारताने पाहुण्या संघाचा 6 गडी राखून पराभव केला. स्मृती मंधाना सामन्याची मानकरी तर दिप्ती शर्मा मालिकेची मानकरी ठरली.
उपकर्णधार स्मृती मानधनाने शतक झळकावून भारताच्या विजयाचा आनंद द्विगुणित केला. कर्णधार हरमनपीत कौरनेही अर्धशतक ठोकले. यासह भारताने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 59 धावांनी पराभव केला तर न्यूझीलंडने दुसरा सामना 76 धावांनी जिंकला होता.
अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम खेळताना 232 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 34 चेंडू शिल्लक असताना सामना आणि मालिका दोन्ही जिंकले. स्मृती मानधनाने खराब फॉर्मची मालिका संपुष्टात आणत शानदार शतक झळकावले.
भारतीय गोलंदाजांपाठोपाठ फलंदाजांनीही न्यूझीलंडला चोख प्रत्युत्तर दिले. स्टायलिश सलामीवीर स्मृती मानधनाने शतक झळकावून फलंदाजांचे नेतृत्व केले. तिने 122 चेंडूत 100 धावा केल्या. तिचे हे आठवे वनडे शतक ठरले. स्मृती मंधाना हिला कर्णधार हरमनप्रीत कौरची (59) उत्तम साथ लाभली. मानधना आणि हरमनप्रीत कौरने टीम इंडियाला 2 बाद 92 वरून 209 धावांपर्यंत पोहोचवले. या धावसंख्येवर मंधानाने तिची विकेट गमावली, पण तोपर्यंत संघाचा विजय निश्चित होता.
मंधाना बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या सहकाऱ्यांसह भारताला 44.2 षटकांत 4 बाद 236 धावा करत विजय मिळवून दिला. मंधाना-हरमनप्रीत शिवाय भारताकडून फलंदाजीत यास्तिका भाटिया 35 धावांचे, जेमिमाह रॉड्रिग्सनं 22 धावांचे तर शफाली वर्मानं 12 धावाचं योगदान दिलं. न्यूझीलंडकडून हॅना रोने दोन तर कर्णधार सोफी डेव्हाईन आणि फ्रॅन जोनासने प्रत्येकी एक विकेट घेतली.
🇮🇳 2-1 🇳🇿
India clinch the ODI series against the T20 world champs 👏
🔗 https://t.co/QkxZRYeSL2 | #INDvNZ pic.twitter.com/IOxmWkbZQk
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 29, 2024
तत्पूर्वी, न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकांत सर्वबाद 232 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ब्रुक हॉलीडेने 96 चेंडूत 9 चौकार अन् 3 षटकारांसह सर्वाधिक 86 धावांची खेळी केली. ली ताहुहू 24 धावा करून नाबाद राहिली. याव्यतिरिक्त न्यूझीलंडकडून जॉर्जिया प्लिमरने 39, मॅडी ग्रीनने 15, इसाबेला गेजने 25, हॅना रोवेने 11 धावांचे योगदान दिले.
ICC Women’s ODI Rankings : दीप्ती शर्माने गाठली कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग…
भारताकडून गोलंदाजीत दीप्ती शर्माने शानदार गोलंदाजी केली. तीने 10 षटकात 39 धावा देत तीन गडी बाद केले. याव्यतिरिक्त 20 वर्षीय प्रिया मिश्राने 10 षटकात 41 धावा देत 2 बळी घेतले. रेणुका ठाकूर सिंग आणि सायमा ठाकोर यांनाही प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आले.





