IND vs NZ 3rd ODI : भारत की न्यूझीलंड कोण मारणार बाजी? वन-डे मालिकेतील निर्णायक सामना आज रंगणार….

IND vs NZ 3rd ODI – भारतीय महिला संघ आणि न्यूझीलंड महिला संघ यांच्यात आज (मंगळवार,दि.28) निर्णायक सामना रंगणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक असा हा सामना असेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना भारतातील स्पोर्ट्स-18 नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर केले जाईल.
तीन सामान्यांच्या मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ मंगळवारी मैदानात उतरेल. या सामन्यामध्ये भारतीय महिला फलंदाजांना दमदार कामगिरी करावीच लागणार आहे. गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत, मात्र रविवारी झालेल्या सामन्यात फलंदाजांनी नांगी टाकल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
रविवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची फलंदाजी सपशेल कोसळली. विजयासाठी आवश्यक असणाऱ्या 260 धावांचा पाठलाग करताना भारताची 8 बाद 108 अशी दयनीय अवस्था झाली होती. राधा यादवने (48) तर सायमा ठाकोर (29) या दोघीनी नवव्या गड्यासाठी 70 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताला किमान दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. भारताचा डाव 183 धावांवर संपुष्टात आला होता.
पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करताना संघाला 59 धावांनी विजय मिळवून दिला होता. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकही करता आलेले नाही. मंगळवारी शेवटच्या निर्णायक लढतीमध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर, सलामीवीर स्मृती मंधाना व शेफाली वर्मा यांना दमदार कामगिरी करावीच लागणार आहे. मधल्या फळीतील जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा व तेजल हसबनीस यांना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
फलंदाज हाराकिरी करत असताना गोलंदाज मात्र धडाकेबाज कामगिरी करता आहेत. पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पाहुण्यांचा डाव 168 धावांमध्ये गुंडाळला होता. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने धडाकेबाज सलामी दिली होती. मात्र त्यानंतर राधा यादवने भेदक गोलंदाजी करताना 4 गडी बाद करत न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले होते. न्यूझीलंडकडून अनुभवी सुझी बेट्स (58) व कर्णधार सोफी डिव्हाईन यांनी जबरदस्त फलंदाजी केली होती.
स्मृतीचा धावांचा संघर्ष
गेल्या काही महिन्यांपासून भारताची जगातील सर्वोत्तम सलामीवीर स्मृती मंधाना धावांसाठी संघर्ष करत आहे. नुकत्याच झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत देखील स्मृतीला चांगली कामगिरी करता आली नव्हती. गेल्या काही महिन्यांपासून स्मृतीच्या अपयशाने भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले आहे. या मालिकेत देखील स्मृती धावासाठी सातत्याने झगडत आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या दोन लढतीत तिला दुहेरी धावसंख्या करता आली नाही.
संघ पुढील प्रमाणे :
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, डी. हेमलथा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक), उमा छेत्री (यष्टिरक्षक), सायली सतगरे, अरुंधती रेड्डी, रेणुकासिंग ठाकूर, तेजल हसबनीस, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा, राधा यादव, श्रेयंका पाटील.
न्यूझीलंड : सोफी डेव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, एडन कार्सन, लॉरेन डाउन, इझी गेज (यष्टिरक्षक), मॅडी ग्रीन, ब्रूक हॅलिडे, पॉली इंग्लिस (यष्टिरक्षक), फ्रॅन जोनास, जेस केर, अमेली केर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर , हॅना रोवे, ली ताहुहू.





