IND vs NZ 2nd Test (Day 1 Highlights) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून पुण्यात खेळला जात आहे. पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव 259 धावांवर आटोपला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 1 विकेट गमावून 16 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा खाते न उघडता टिम साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. टीम इंडिया सध्या पहिल्या डावात अजूनही 243 धावांनी पिछाडीवर आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन करणारा वॉशिंग्टन सुंदर हा पुणे कसोटीतील पहिल्या दिवसाचा स्टार खेळाडू ठरला, ज्याने किवी संघाच्या 7 फलंदाजांना बाद करून आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली.
न्यूझीलंडला 259 धावांत गुंडाळल्यानंतर भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल ही सलामीची जोडी मैदानात उतरली. रोहित सुरुवातीपासूनच क्रीजवर असह्य वाटत होता त्यामुळे एकूण 8 चेंडूंचा सामना करूनही त्याला खातेही उघडता आले नाही. टीम साऊथीच्या षटकातील (2.6) शेवटच्या चेंडूवर रोहित त्रिफळाचित झाला. रोहितचे हावभाव पाहून तो सौदीचा हा चेंडू समजून घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे रोहितला इच्छा नसतानाही खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. हिटमॅन सध्याच्या कसोटी मालिकेत दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. त्यानंतर शुभमन गिल (नाबाद 10 धावा) आणि यशस्वी जैस्वाल (नाबाद 6) यांनी संयमी खेळी केली आणि दिवसअखेर आणखी पडझड होऊ दिली नाही.
Stumps on Day 1 of the 2nd Test.#TeamIndia trail by 243 runs in the first innings.
Scorecard – https://t.co/3vf9Bwzgcd… #INDvNZ @IDFCFIRSTBank pic.twitter.com/diCyEeghM4
— BCCI (@BCCI) October 24, 2024
तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार लॅथम पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला, त्याला अश्विनने 15 धावांवर बाद केले. विल यंगही अवघ्या 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र त्यानंतर डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांच्या 62 धावांच्या भागीदारीने किवी संघाला मजबूत स्थितीत आणले. कॉनवेने 76 धावांचे तर रवींद्रने 65 धावांचे योगदान दिले.
एकवेळ न्यूझीलंडने 3 विकेट गमावून 197 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती, ते मोठ्या धावसंख्येकडे जोरदार वाटचाल करतील असे वाटत होते. पण येथून पुढे वॉशिंग्टन सुंदरने कहरच केला आणि पुढील सात बळी घेत त्याने न्यूझीलंडची फलंदाजी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. 197 धावसंख्येवरून विकेट्स पडण्याची पडझड सुरू झाली आणि त्यांचा डाव 259 धावसंख्येवरच आटोपला. पाहुण्या संघाच्या शेवटच्या सहापैकी पाच फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. न्यूझीलंडच्या डावातील शेवटच्या 6 विकेट 62 धावांतच पडल्या.
सुंदरने आधी रचिन रवींद्र (65), नंतर टॉम ब्लंडेल (3) आणि त्यानंतर डॅरिल मिशेल (18) यांना आपला बळी बनवले. यानंतर त्याने ग्लेन फिलिप्स (9), टीम साऊदी (5), एजाज पटेल (4), मिचेल सँटनर (33) यांना आपले बळी बनवले आणि न्यूझीलंडचा डाव संपुष्टात आणला. सुंदरने 23.1 षटकात गोलंदाजी करताना 59 धावा दिल्या आणि एकूण 7 विकेट घेतल्या. अश्विनने 24 षटके टाकली आणि 3 बळी घेतले.