IND vs NZ 2nd T20I : सूर्या-इशानचा ‘रुद्र’ अवतार! अवघ्या १५.२ षटकांत न्यूझीलंडचा धुरळा उडवत रचला विश्वविक्रम
IND vs NZ 2nd T20I : किवींच्या २०८ धावांच्या लक्ष्याला टीम इंडियाने कस्पटासमान लेखतं अवघ्या १५.२ ओव्हरमध्येच सामना संपवून मोठा विश्वविक्रम केला.

IND vs NZ 2nd T20I Highlights : छत्तीसगडच्या रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर भारतीय संघाने न्यूझीलंडला दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ विकेट्सनी धूळ चारली आहे. २०९ धावांचे डोंगरासारखे लक्ष भारताने अवघ्या १५.२ षटकांत पूर्ण करून ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे. या विजयासोबतच भारताने टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद २०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करण्याचा विश्वविक्रमही आपल्या नावावर केला.
न्यूझीलंडने उभा केला होता धावांचा डोंगर –
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ६ बाद २०८ धावा केल्या होत्या. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि टिम सायफर्टने आक्रमक सुरुवात दिली. त्यानंतर रचिन रवींद्रने २६ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकांत कर्णधार मिचेल सँटनरने २७ चेंडूत नाबाद ४७ धावा कुटल्या, ज्यामुळे न्यूझीलंडला २०० पार मजल मारता आली.
भारताकडून कुलदीप यादवने २ बळी घेतले, तर हर्षित राणा, हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांना प्रत्येकी १ विकेट घेतली. अर्शदीप सिंग मात्र महागडा ठरला, त्याने ४ षटकांत ५३ धावा दिल्या.
As breathtaking as it can get 💥#TeamIndia sail over the finish line with 7⃣ wickets to spare in Raipur ⛵️
With that, they lead the series 2⃣-0⃣ 👏
Updates ▶️ https://t.co/8G8p1tq1RC#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/UXOo96Qbup
— BCCI (@BCCI) January 23, 2026
इशान किशनचे विक्रमी अर्धशतक –
२०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशनने पहिल्या चेंडूपासून न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने अवघ्या ३२ चेंडूत ७६ धावा ठोकल्या (११ चौकार, ४ षटकार). विशेष म्हणजे, त्याने केवळ २१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा तो भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याचा स्ट्राईक रेट २३७.५० इतका होता. त्याने यासह अभिषेक शर्माचा सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम मोडला.
सूर्यकुमार यादवने साकारली ८२ धावांची वादळी खेळी
‘सूर्या’ची फटकेबाजी अन् विश्वविक्रम –
इशान किशन बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने मैदानाचा ताबा घेतला. ‘मिस्टर ३६०’ ने अवघ्या ३७ चेंडूत नाबाद ८२ धावांची आतिशी खेळी केली. यात ९ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. सूर्याने अवघ्या २३ चेंडूत पन्नास गाठली. त्याला शिवम दुबेने (१८ चेंडूत ३६* धावा) उत्तम साथ दिली. भारताने हे लक्ष्य १६ षटकांच्या आत पूर्ण केले, अशी कामगिरी करणारा भारत जगातील पहिला संघ ठरला आहे.





