IND vs ENG : भारतीय संघात मोठा बदल, दुसऱ्या कसोटीपूर्वी ‘हा’ वेगवान गोलंदाज मायदेशी परतणार

हर्षित राणा मायदेशी परतणार –
जेव्हा इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली, तेव्हा त्यात हर्षित राणाचे नाव समाविष्ट नव्हते. राणा भारत-अ संघाचा भाग होता आणि त्याला इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दोन अनौपचारिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळायचे होते. या मालिकेनंतर खबरदारी म्हणून राणाला मुख्य संघात सामील करण्यात आले होते, तर इतर खेळाडू घरी परतले होते.
भारतीय संघासोबत बर्मिंगहॅमला जाणार नाही –
आता लीड्स कसोटी सामना संपल्यानंतर संघ व्यवस्थापनाने हर्षित राणाला संघातून रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तो मायदेशी परतण्यासाठी उड्डाण करणार आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या निवेदनात सांगितले की, हर्षित राणाला संघातून रिलीज करण्यात आले आहे. तो २ जुलैपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघासोबत बर्मिंगहॅमला जाणार नाही.
हेही वाचा – Dinesh Karthik : दिनेश कार्तिकने खरंच भारतीय संघाला ‘डॉबरमॅन’ म्हटलं का? सत्य जाणून घ्या!
बुमराह वगळता इतर गोलंदाज ठरले प्रभावहीन –
लीड्स कसोटी सामन्यातील पराभवाची दोन प्रमुख कारणे होती: एक म्हणजे खराब क्षेत्ररक्षण आणि दुसरे म्हणजे जसप्रीत बुमराह वगळता इतर गोलंदाजांचा अपेक्षेनुसार कामगिरी न करणे. यात सर्वात निराशाजनक कामगिरी प्रसिध कृष्णाची दिसली, ज्याने या सामन्यात तब्बल २२० धावा दिल्या आणि केवळ ५ बळी मिळवले. दुसरीकडे, मोहम्मद सिराजलाही केवळ २ बळी घेण्यात यश आले. त्यामुळे बर्मिंगहॅम कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता निश्चित मानली जात आहे.





