IND vs ENG : लॉर्ड्सवर गिलने मोडला द्रविडचा 23 वर्षांचा विक्रम, आता कोहलीच्या रेकॉर्डवर नजर

IND vs ENG Shubman Gill Breaks Rahul Dravid’s Record : भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. गिलने इंग्लंडमध्ये भारतासाठी एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. त्याने राहुल द्रविड यांचा विक्रम मोडत हा ऐतिहासिक पराक्रम केला. लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात २ धावा करताच शुबमन गिलने ही कामगिरी आपल्या नावावर केली.
गिलने राहुल द्रविडला टाकले मागे –
गिलने तीन सामन्यांच्या ६ डावांत एकूण ६०७ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, २००२ मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर द्रविड यांनी चार सामने खेळले आणि सहा डावांत एकूण ६०२ धावा केल्या होत्या. या कसोटीच्या पहिल्या डावात १६ धावा करणाऱ्या गिलला दुसऱ्या डावात द्रविड यांचा विक्रम मोडण्यासाठी फक्त दोन धावांची गरज होती. त्याने ब्रायडन कार्सने टाकलेल्या १३व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत हा पराक्रम साध्य केला.
इंग्लंडमधील एका कसोटी मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:
- शुबमन गिल (२०२५) – ३ सामन्यांत ६०७ धावा
- राहुल द्रविड (२००२) – ४ सामन्यांत ६०२ धावा
- विराट कोहली (२०१८) – ५ सामन्यांत ५९३ धावा
- सुनील गावस्कर (१९७९) – ४ सामन्यांत ५४२ धावा
- राहुल द्रविड (२०११) – ४ सामन्यांत ४६१ धावा
हेही वाचा – IND vs ENG : मोहम्मद सिराजवर ICC ची मोठी कारवाई, लॉर्ड्सवर ‘ती’ चूक करणं पडलं महागात!
गिलला विराटचा विक्रम मोडण्याची संधी –
शुबमन गिलसाठी लॉर्ड्स येथील हा कसोटी सामना फलंदाजीच्या दृष्टिकोनातून फारसा यशस्वी ठरला नाही. गिलने पहिल्या डावात १६ आणि दुसऱ्या डावात ६ अशा एकूण २२ धावा केल्या. तरीही, या मालिकेत त्याने आतापर्यंत ६०७ धावा केल्या आहेत. जर पुढील सामन्यात गिल ५० धावा करण्यात यशस्वी झाला, तर तो भारतीय कर्णधाराचा मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडेल. विराट कोहलीने २०१६ मध्ये भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत पाच सामन्यांत एकूण ६५५ धावा केल्या होत्या.





