IND vs ENG : शुबमन गिलने झळकावले ऐतिहासिक शतक, सचिननंतर ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय

IND vs ENG Shubman Gill Century : इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचा युवा कर्णधार शुबमन गिलची बॅट तळपत आहे. मँचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या डावात गिलने शानदार शतक ठोकून आपल्या संघाला मजबूत स्थितीत आणले आणि एक ऐतिहासिक विक्रमही आपल्या नावावर केला. या मालिकेतील हे त्याचे चौथे शतक आहे. विशेष म्हणजे, मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर ३५ वर्षांनंतर भारतीय कर्णधाराने शतक ठोकले आहे. इतकेच नव्हे, तर सचिन तेंडुलकरनंतर या मैदानावर शतक ठोकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
मँचेस्टर कसोटीत भारतीय संघ दुसऱ्या डावात अडचणीत होता. इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीला धक्के देत भारतावर दडपण आणले होते. पण कर्णधार शुबमन गिलने संयम राखत अप्रतिम खेळी केली. गिलने आपली खेळी सावधपणे सुरू केली आणि हळूहळू गती वाढवली. त्याच्या कव्हर ड्राइव्ह, लॉफ्टेड शॉट्स आणि बॅकफूट पंच यांनी इंग्लिश गोलंदाजांना हतबल केले. गिलने १०० धावांचा टप्पा गाठण्यासाठी एकूण २२८ चेंडूंचा सामना केला.
Lunch on Day 5 in Manchester 🏟️#TeamIndia 223/4 in the 2nd innings, trail by 88 runs
Washington Sundar and Ravindra Jadeja at the crease
Scorecard ▶️ https://t.co/L1EVgGu4SI#ENGvIND pic.twitter.com/7R4XVREk61
— BCCI (@BCCI) July 27, 2025
३५ वर्षांनंतर रचला इतिहास –
मँचेस्टरमध्ये शुबमन गिलने शतक ठोकत ३५ वर्षांचा दुष्काळ संपवला. यापूर्वी १९९० मध्ये सचिन तेंडुलकरने या मैदानावर शतक झळकावले होते. याशिवाय, मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारतीय कर्णधारांसाठी शतक बनवणे नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. १९९० मध्ये मोहम्मद अझरुद्दीन यांनी कर्णधार म्हणून येथे शतक झळकावले होते. यानंतर गिलने ३५ वर्षांनंतर हा दुष्काळ संपवत इतिहास रचला. ही कामगिरी विशेष आहे, कारण गिलने कमी वयातच भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व स्वीकारले आहे आणि सातत्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.
हेही वाचा – IND vs ENG : शुबमन गिलने मोडला विराटचा विक्रम, सेना देशांमध्ये हा पराक्रम करणारा पहिलाच आशियाई फलंदाज
गिलने गावस्कर-ब्रॅडमनची केली बरोबरी –
यासोबतच, शुबमन गिलने इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला. यापूर्वी २०२४ मध्ये यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्ध एका मालिकेत ७१२ धावा केल्या होत्या. गिलने आता त्याला मागे टाकले आहे. एवढेच नव्हे, तर डॉन ब्रॅडमन आणि सुनील गावस्कर यांच्यानंतर एका कसोटी मालिकेत ४ शतके ठोकणारा गिल हा तिसरा कर्णधार ठरला आहे.





