IND vs ENG Semifinal : भारत-इंग्लंड सेमीफायनलने मोडला व्ह्यूअरशिपचा जागतिक विक्रम, तब्बल ‘इतक्या’ लोकांनी पाहिला लाईव्ह सामना
IND vs NZ Semifinal : कोणत्याही क्रीडा प्रकारासाठी 'पीक कॉनकरन्सी'चा (एकाच वेळी पाहणारे प्रेक्षक) हा आतापर्यंतचा सर्वात मोठा जागतिक विक्रम आहे.

IND vs ENG Semifinal Digital Record : टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्याने डिजिटल प्लॅटफॉर्मवर नवा इतिहास रचला आहे. जिओ हॉटस्टारवर (Jio Hotstar) हा सामना एकाच वेळी तब्बल ६५.२ मिलियन (६.५२ कोटी) प्रेक्षकांनी लाईव्ह पाहिला. कोणत्याही क्रीडा प्रकारासाठी ‘पीक कॉनकरन्सी’चा (एकाच वेळी पाहणारे प्रेक्षक) हा आतापर्यंतचा सर्वात मोठा जागतिक विक्रम आहे.
जय शाह यांनी दिली माहिती –
आयसीसी (ICC) अध्यक्ष जय शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर या यशाची माहिती शेअर केली. त्यांनी लिहिले की, “भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामन्याने डिजिटल प्रेक्षकसंख्येचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. ६५.२ मिलियन प्रेक्षकांनी या सामन्याचा थरार एकाच वेळी अनुभवला. हे यश जागतिक क्रिकेटची ताकद आणि भारतीय चाहत्यांचे क्रिकेटप्रती असलेले प्रेम दर्शवते.”
रोमांचक सामन्यामुळे प्रेक्षक खिळले –
Second semi-final of the @ICC #T20WorldCup 2026 has shattered the world record for digital viewership. The match between @BCCI and @EnglandCricket registered a peak digital concurrency of 65.2 million viewers @JioHotstar which is the highest for any live event across the world.…
— Jay Shah (@JayShah) March 6, 2026
या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठा टिकून होती, ज्यामुळे प्रेक्षक स्क्रीनला खिळून राहिले. भारताने प्रथम फलंदाजी करताना २५३ धावांचा डोंगर उभारला होता, ज्यामध्ये संजू सॅमसनने सर्वाधिक ८९ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या जेकब बेथेलने १०५ धावांचे झुंजार शतक झळकावले, मात्र इंग्लंडला २४६ धावांपर्यंतच मजल मारता आली आणि भारताने ७ धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली.
भारताने १४ वर्षानंतर रचला नवीन इतिहास –
संजू सॅमसनची स्फोटक फलंदाजी, बुमराह-हार्दिकने मोक्याच्या क्षणी केलेली शानदार गोलंदाजी आणि अक्षर पटेलने केलेले उत्तम क्षेत्ररक्षण यामुळे भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. यासह भारतीय संघाने नवीन इतिहास रचला आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत केवळ एकदाच असे घडले होते की, यजमान देशाने अंतिम फेरी गाठली होती. २०१२ मध्ये श्रीलंकेने यजमान म्हणून खेळताना फायनलपर्यंत मजल मारली होती. यानंतर आता यजमान म्हणून फायनल गाठणारा भारत हा जगातील केवळ दुसरा देश ठरला आहे.





