IND vs ENG : ऋषभने शतकानंतर कोलांटी उडी मारत वेधलं लक्ष, इंग्लिश खेळाडूंसह प्रेक्षकही थक्क, पाहा VIDEO

IND vs ENG Rishabh Pant Celebration after century : भारतीय संघाचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात आपल्या फलंदाजीने शानदार पद्धतीने केली आहे. लीड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली तेव्हा, ६५ धावांवर नाबाद असलेल्या पंतने आपली खेळी तिथूनच पुढे नेली, जिथून त्याने पहिल्या दिवशी थांबवली होती. पंतने १४६ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक आहे. लीड्स कसोटीत शतक पूर्ण करताना पंतने ज्या उत्साहपूर्ण पद्धतीने सेलिब्रेशन केले, ते पाहून इंग्लंडचा संघ आणि मैदानावर उपस्थित प्रेक्षकही थक्क झाले.
ऋषभ पंतचे शतकानंतर जबरदस्त सेलिब्रेशन –
इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटी सामन्यात ऋषभ पंतने शोएब बशीरच्या चेंडूवर षटकार लगावत आपले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण करताच पंतने आपले हेल्मेट आणि हातमोजे काढून ठेवले आणि बॅट बाजूला ठेवत मैदानावर जोरदार कोलांटी उडी मारली. यापूर्वी पंतने असे सेलिब्रेशन आयपीएल २०२५ मध्येही केले होते, जेव्हा त्याने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले होते. पंतच्या या शतकासह भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासात परदेशात अशी सहावी वेळ घडली आहे, जेव्हा भारताच्या एका डावात तीन फलंदाजांनी शतके ठोकली आहेत.
From “stupid stupid stupid”
To “superb superb superb”We’ve came a long way 🤣❤️pic.twitter.com/NR3oBE8P2j
— CricketDekhNa🇮🇳 (@cricketdekhna) June 21, 2025
गिल-पंतने साकारली २०९ धावांची भागीदारी –
ऋषभ पंत आणि शुबमन गिल यांच्यात चौथ्या विकेट्ससाठी २०९ धावांची विक्रमी भागीदारी झाली, ज्याच्या जोरावर भारतीय संघाने लीड्स कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ४०० पेक्षा अधिक धावा केल्या. कर्णधार गिल, जो प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहेत, त्यानी २२७ चेंडूत १४७ धावांची उत्कृष्ट खेळी केली, ज्यात त्यांनी १९ चौकार आणि एका षटकार समावेश होता.
हेही वाचा – IND vs ENG : ऋषभ पंतने उत्तुंग षटकारासह ठोकले दमदार शतक, मोडला धोनीचा सर्वात मोठा विक्रम!
दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारताने चार विकेट्स गमावल्या –
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय संघाने चार विकेट्स गमावल्या. लंच ब्रेकपर्यंत भारताने सात विकेट्सवर ४५४ धावा केल्या आहेत. सध्या रवींद्र जडेजा दोन धावांसह क्रीजवर आहे. भारताने दुसऱ्या दिवसाची सुरुवात तीन विकेटवर ३५९ धावांवर केली. ऋषभ पंत आणि कर्णधार शुबमन गिल चांगली फलंदाजी करत होते. यादरम्यान पंतने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सातवे शतकही झळकावले, परंतु शोएब बशीरने गिलला बाद करून ही भागीदारी मोडली.
हेही वाचा – IND vs ENG : ऋषभ पंतच्या खेळीने केएल राहुल ‘इम्प्रेस’, पहिल्या दिवसानंतर जोडले हात, पाहा VIDEO
नायर पुनरागमनात ठरला अपयशी –
गिल बाद झाल्यानंतर करुण नायरही जास्त वेळ क्रीजवर राहिला नाही आणि तो आपले खाते न उघडता स्टोक्सचा बळी घेतला. नायर आठ वर्षांनी भारतीय संघात परतला आहे, परंतु पहिल्या डावात तो प्रभाव पाडू शकला नाही. त्यानंतर पंतही जोश टंगचा बळी ठरला आणि सहावा फलंदाज म्हणून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर स्टोक्सने शार्दुल ठाकूरला बाद करून भारताला सातवा धक्का दिला. शार्दुलच्या बाद होताच लंच ब्रेक जाहीर करण्यात आला.





