IND vs ENG : भारताला हरवण्याचा पॅटर्न? अश्विनने उघड केलं पंच पॉल रायफलचं सत्य

IND vs ENG R Ashwin on Paul Reiffel Decision : भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान अनेक वादग्रस्त पंचांचे निर्णय समोर आले आहेत, विशेषतः ऑस्ट्रेलियन पंच पॉल रायफल यांचे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. चौथ्या दिवशी काही निर्णयांमुळे माजी खेळाडू आणि चाहत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. माजी भारतीय ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने पॉल रायफल यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आणि भारताविरुद्ध चुकीचे निर्णय देण्याचा एक पॅटर्न तयार झाला आहे, असे म्हटले.
अश्विनने पॉल रायफलच्या निर्णयावर उपस्थित केले प्रश्न –
आपल्या यूट्यूब चॅनेलवर अश्विनने रायफल यांच्यासोबतच्या अनुभवाबद्दल सांगितले. तो म्हणाला, “पॉल रीफेल यांच्यासोबतचा माझा अनुभव… मी असं नाही म्हणत की त्यांनी मला आऊट द्यावं. मुद्दा असा आहे की, जेव्हा भारत गोलंदाजी करतो, तेव्हा त्यांना वाटतं की फलंदाज आऊट नाही. पण जेव्हा भारताची फलंदाजी असते, तेव्हा त्यांना वाटतं की फलंदाज आऊट आहे. जर असं फक्त भारताविरुद्धच नाही, तर सर्व संघांविरुद्ध होत असेल, तर आयसीसीने याकडे लक्ष द्यायला हवं.”
अश्विनने दोन निर्णयांवर दिला विशेष भर –
पहिल्या निर्णयात, मोहम्मद सिराजने जो रूटविरुद्ध केलेली एलबीडब्ल्यूची अपील नाकारली गेली. रीप्ले मध्ये दिसलं की चेंडू लेग स्टंपला स्पर्श करत होता, पण डीआरएसच्या ‘अंपायर कॉल’ नियमामुळे मैदानावरील निर्णय कायम राहिला. दुसऱ्या निर्णयात, शुबमन गिलला शेवटच्या क्षणी ब्रायडन कार्सच्या चेंडूवर रायफलने कॅच आउट दिलं, पण डीआरएसमध्ये स्पष्ट दिसलं की चेंडू बॅटला लागला नव्हता. अश्विनने आणखी एका निर्णयाचा उल्लेख केला जिथे बॅट आणि चेंडूमध्ये मोठं अंतर होतं.
हेही वाचा – IND vs ENG : सिराजला दंड, मग गिलला माफी का? स्टुअर्ट ब्रॉडचा आयसीसीवर हल्लाबोल!
अश्विन म्हणाला की माझे वडील माझ्यासोबत एकदा सामना पाहत होते आणि ते म्हणाले, ‘जेव्हा पॉल रायफल पंच असतात, तेव्हा भारत जिंकत नाही.’ एवढंच नाही, तर माइक अथरटन आणि नासिर हुसेन यांनीही सांगितलं की पंचांनी खेळाडूंना वेळ वाया घालवण्याबाबत अधिक कठोरपणे कारवाई करायला हवी. माजी कर्णधार आणि महान फिरकीपटू अनिल कुंबले यांनीही पॉल रायफल यांच्या निर्णयांवर आपलं मत मांडलं. ते म्हणाले की असं वाटतंय की पॉल रायफल यांनी ठरवलं आहे की काहीही झालं तरी आउट द्यायचं नाही.





