Pataudi Trophy: ‘अँडरसन-तेंडुलकर’ की ‘पतौडी’? सचिनच्या विनंतीने जपला इतिहास, चाहत्यांकडून कौतुक

Pataudi Trophy name : भारत आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित कसोटी मालिकेला ‘पतौडी ट्रॉफी’ या नावाने ओळखले जाते. मात्र, यंदा इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) ही ट्रॉफी निवृत्त करून तिचे नाव ‘एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’ असे बदलण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाला भारतातून तीव्र विरोध झाला, आणि क्रिकेटचा ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर यांनी याबाबत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अखेर, सचिनच्या विशेष विनंतीमुळे आणि बीसीसीआयच्या पाठपुराव्यामुळे ही ट्रॉफी पुन्हा ‘पतौडी ट्रॉफी’ नावानेच ओळखली जाईल.
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या नावाचा गौंधळ –
क्रीकबजच्या वृत्तानुसार, बीसीसीआय आणि ईसीबी अधिकाऱ्यांना निश्चितच ‘पतौडी’ हे नाव भारत आणि इंग्लंड मालिकेशी जोडले जावे अशी इच्छा होती. परंतु त्याच वेळी, ते सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांना त्यांच्या नावाने मालिकेचे नाव देऊन त्यांचा सन्मान करू इच्छित होते. यामुळे मन्सूर अली खान पतौडी यांच्या स्मृतीला धक्का लागेल, अशी भावना क्रिकेटप्रेमींमध्ये निर्माण झाली.
सचिनच्या पुढाकाराचे क्रिकेटप्रेमींकडून कौतुक –
🚨 PATAUDI TROPHY TO CONTINUE. 🚨
– Sachin Tendulkar himself made a request to the BCCI and ECB to continue with the Pataudi legacy. Jay Shah played a pivotal role in ensuring Pataudi name remains undiminished. (Cricbuzz). pic.twitter.com/1unAMb5DKU
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 15, 2025
मन्सूर अली खान पतौडी यांनी भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून ही ट्रॉफी २००७ मध्ये सुरू झाली होती. या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, आणि सचिनने स्वत: यात लक्ष घातले. सचिन आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी १४ जून रोजी लंडनमधील भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये आयसीसी अध्यक्ष जय शहा यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेत सचिनने पटौडी ट्रॉफीच्या ऐतिहासिक महत्त्वावर भर देत ती कायम ठेवण्याची विनंती केली. यानंतर बीसीसीआयच्या पाठिंब्यामुळे ईसीबी ने आपला निर्णय मागे घेतला. सचिनच्या या पुढाकाराचे क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर कौतुक केले आहे.
लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचे अनावरण होणार होते. मात्र, अहमदाबाद विमान अपघात दुर्घटनेत २४१ जणांचा मृत्यू झाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. भारत आणि इंग्लंड यांच्यात २० जूनपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ या मालिकेसाठी जोरदार तयारी करत आहे.





