IND vs ENG : भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर! ‘या’ घातक गोलंदाजाने ४ वर्षांनी केलं कमबॅक

Jofra Archer Returns to England Test Squad : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना बर्मिंगहॅम येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला संघात समाविष्ट केले आहे. पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर आता इंग्लंडचे लक्ष दुसरा सामना जिंकण्यावर आहे.
आर्चरचे चार वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन –
जोफ्रा आर्चर २०२१ नंतर प्रथमच कसोटी संघात परतला आहे. २०२१ नंतर दुखापतीमुळे तो कसोटी संघाबाहेर होता. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन संघात परतला आहे. २ जुलैपासून एजबेस्टन येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी आर्चरला कदाचित प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल. आर्चरने इंग्लंडसाठी आतापर्यंत १३ कसोटी सामने खेळले आहेत.
जोफ्रा आर्चरचा संघात समावेश –
BREAKING: Jofra Archer is back in England’s Test squad for the first time since February 2021! 🚨 pic.twitter.com/BsXJILOIez
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 26, 2025
पहिल्या कसोटी सामन्यानंतर ईसीबीच्या निवड समितीने संघात फक्त एक बदल केला आहे. त्यांनी जोफ्रा आर्चरला संघात स्थान दिले आहे. आयपीएल दरम्यान आर्चरच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. तथापि, ससेक्सकडून काउंटी क्रिकेट खेळून त्याने आपली तंदुरुस्ती सिद्ध केली. त्यानंतर त्याला संघात घेण्यात आले. ससेक्सकडून आर्चरने १८ षटकांत ३२ धावा देत १ विकेट्स घेतली होती.
हेही वाचा – Suryakumar Yadav : टी-२० कर्णधार सूर्याची मोठी अपडेट; शस्त्रक्रियेनंतर कधी दिसणार मैदानावर?
इंग्लंडची वेगवान गोलंदाजी अधिक मजबूत –
हेडिंग्ले येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात जोश टंगने उत्कृष्ट कामगिरी करत ७ विकेट्स घेतले आणि इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. कर्णधार बेन स्टोक्सने ५ विकेट्स, तर ब्रायडन कार्सने ४ विकेट्स घेतल्या, ज्यामुळे इंग्लंडचे वेगवान गोलंदाजी आक्रमण मजबूत दिसत आहे. आता या वेगवान गोलंदाजीच्या यादीत जोफ्रा आर्चरचे नावही सामील झाले आहे.
हेही वाचा – ICC New Cricket Rules : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नवीन नियम जाहीर, कोणते आहेत? जाणून घ्या
भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा कसोटी संघ:
बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स





