IND vs ENG : जो रूटची ऐतिहासिक कामगिरी! भारताविरुद्ध तिसऱ्यांदा ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिलाच खेळाडू
IND vs ENG Joe Root most runs record against India : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जो रूटने अप्रतिम कामगिरी करताना एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. या मालिकेत रूटने 537 धावा करत भारताविरुद्ध एका कसोटी मालिकेत 500 हून अधिक धावा करण्याचा पराक्रम तिसऱ्यांदा केला आहे. याआधी कोणत्याही फलंदाजाला असा विक्रम करता आलेला नाही.
2014 आणि 2021 मध्येही रूटने केली होती कमाल –
जो रूटने याआधी 2014 आणि 2021 मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये 500 हून अधिक धावा केल्या होत्या. 2021 मध्ये त्याने 737 धावा केल्या होत्या, तेव्हा विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता. तर 2014 मध्ये रूटने 518 धावा केल्या होत्या, जेव्हा एमएस धोनी भारतीय संघाचे नेतृत्व करत होता. यंदा शुबमन गिल भारतीय संघाचा कर्णधार आहे.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा रूट दुसरा खेळाडू –
This man loves to play against India and he owns Indian bowling.#joeRoot #ENGvIND pic.twitter.com/din4juaKpt
— Zaraq Afzal (@afzal_zara26257) August 3, 2025
या मालिकेत जो रूट 537 धावांसह दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 5 सामन्यांच्या 9 डावांमध्ये 67.12 च्या सरासरीने 3 शतकांसह 537 धावा केल्या. मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा मान भारतीय कर्णधार शुबमन गिलच्या नावावर आहे. गिलने 5 सामन्यांच्या 10 डावांमध्ये 75.40 च्या सरासरीने 754 धावा केल्या, ज्यात एका द्विशतकासह 4 शतकांचा समावेश आहे.
ओव्हल कसोटी रोमांचक वळणावर –
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 374 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 6 बाद 339 धावा केल्या आहेत. अंतिम दिवशी इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची, तर भारताला विजयासाठी 4 विकेट्सची गरज आहे.





