IND vs ENG : टीम इंडियाने रचला नवा इतिहास! मोडला ६१ वर्षांपूर्वीचा विक्रम

400 बाऊंड्रीजचा टप्पा केला पार –
पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी 23 बाऊंड्रीज लगावल्या. यासह मालिकेत भारताने 416 बाऊंड्रीजचा आकडा गाठला, जो एका कसोटी मालिकेत भारताचा सर्वोच्च आहे. यापूर्वी 1964 मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताने 384 बाऊंड्रीज ठोकल्या होत्या. तसेच, 1979 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने 361 बाऊंड्रीज नोंदवल्या होत्या, परंतु त्या मालिकेतील काही खेळाडूंच्या चौकारांचा डेटा उपलब्ध नाही.
गिल-राहुलचा मालिकेत राहिला दबदबा –
या मालिकेत शुबमन गिल आणि केएल राहुल यांनी भारतीय संघासाठी सर्वाधिक योगदान दिले. गिलने 743 धावांसह चार शतके ठोकली, तर राहुलने 525 धावांसह दोन शतके झळकावली. याशिवाय ऋषभ पंत (479 धावा), रवींद्र जडेजा (463 धावा), यशस्वी जैस्वाल (293 धावा) आणि वॉशिंगटन सुंदर (224 धावा) यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. या मालिकेत भारताच्या सहा फलंदाजांनी शतके ठोकली, ज्यामध्ये गिल, पंत, राहुल, जैस्वाल, जडेजा आणि सुंदर यांचा समावेश आहे.
या मालिकेत भारतीय फलंदाजांनी आपल्या आक्रमक खेळाने सर्वांचे लक्ष वेधले. विशेषतः शुबमन गिलने आपल्या सातत्यपूर्ण फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. भारतीय संघाने या मालिकेत दमदार खेळ दाखवत इंग्लंडला प्रत्येक सामन्यात कडवी लढत दिली आहे. हा विक्रम भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल. भारतीय संघाची ही ऐतिहासिक कामगिरी क्रिकेटप्रेमींसाठी अभिमानास्पद आहे.





