IND vs ENG 2nd Test, Ravichandran Ashwin Record : विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पाहुण्या इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला. भारतीय संघाने इंग्लंडला 399 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लिश संघ केवळ 292 धावांत गारद झाला. भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने या सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने 45 वर्षांचा मोठा विक्रम मोडला.
पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा 28 धावांनी पराभव झाला होता. अशा स्थितीत रोहित ब्रिगेडने विशाखापट्टणममधील मागील पराभवाचा बदला घेत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. दुसऱ्या कसोटीत वरिष्ठ ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने तीन विकेट घेतल्या. यासह त्याने एक मोठी उपलब्धीही आपल्या नावावर केली.
अश्विनने मोडला 45 वर्षे जुना विक्रम…
रवी अश्विन आता इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या 21 कसोटी सामन्यात 97 बळी घेतले आहेत. याआधी इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम भागवत चंद्रशेखरच्या नावावर होता. चंद्रशेखरने 1964 ते 1979 दरम्यान इंग्लंडविरुद्ध 23 कसोटी सामन्यात 95 विकेट घेतल्या होत्या. अशाप्रकारे अश्विनने त्याचा 45 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. अश्विनने दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बेन डकेटला बाद करून हा विक्रम आपल्या नावावर केला.
अश्विन 500 बळींच्या जवळ…
अश्विनच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये 499 विकेट्स आहेत. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याला 500वा बळी घेता आला नाही.
#AUSvWI ODI Series : ऑस्ट्रेलियाचा विडिंजला व्हाईटवॉश; 259 चेंडू शिल्लक ठेऊन जिंकला तिसरा सामना…
भारतात पहिल्यांदाच असे घडले…
या कसोटीत भारत आणि इंग्लंड दोन्ही डावात सर्वबाद झाले होते. मात्र, दोघांनीही आपापल्या प्रत्येक डावात 250 हून अधिक धावा केल्या. भारताने पहिल्या डावात 396 धावा आणि दुसऱ्या डावात 255 धावा केल्या. इंग्लंडने पहिल्या डावात 253 धावा आणि दुसऱ्या डावात 292 धावा केल्या. दोन्ही संघांनी आपापल्या दोन्ही डावात 250 हून अधिक धावा करण्याची आणि दोघेही सर्वबाद होण्याची ही भारतातील पहिलीच वेळ आहे.