IND vs ENG : लॉर्ड्स कसोटीत स्टोक्सचा फलंदाजीचा निर्णय! दोन्ही संघांत प्रत्येकी एक बदल, पाहा प्लेइंग इलेव्हन

IND vs ENG 3rd Test Updates : लॉर्ड्स येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला असून, जोश टंगच्या जागी जोफ्रा आर्चरला संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, भारतीय कर्णधार शुबमन गिल याने सांगितले की, त्याने नाणेफेक जिंकली असती तर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असता. त्यामुळे नाणेफेकीच्या निर्णयाचा फारसा तोटा झाला नाही. भारतीय संघातही एक बदल झाला असून, प्रसिध कृष्णाच्या जागी जसप्रीत बुमराहला स्थान देण्यात आले आहे.
बुमराह-आर्चरचे पुनरागमन –
इंग्लंडने सामन्याच्या एक दिवस आधीच प्लेइंग इलेव्हन जाहीर केली होती. जोफ्रा आर्चरच्या पुनरागमनामुळे इंग्लंडचे गोलंदाजी आक्रमण अधिक मजबूत झाले आहे. पूर्णपणे तंदुरुस्त झालेला हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. आर्चरचे चार वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीसाठी फक्त एक बदल केला असून, जोश टंगच्या जागी आर्चरला समाविष्ट केले आहे. त्याबरोबर बुमराहच्या पुनरागमनामुळे भारताची गोलंदाजी बळकट झाली आहे.
🚨 Toss and Team Update 🚨
England win the toss and elect to bat in the 3rd Test.
Jasprit Bumrah is back in the eleven 🙌
Updates ▶️ https://t.co/X4xIDiSmBg#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/uulWRWPOaU
— BCCI (@BCCI) July 10, 2025
भारताचा लॉर्ड्सवरील कसोटी रेकॉर्ड –
लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर भारतीय संघाचा विक्रम फारसा चांगला नाही. या मैदानावर भारतीय संघाने १९ कसोटी सामने खेळले असून सर्व यजमान इंग्लंडविरुद्ध होते. यापैकी केवळ तीन सामन्यांत भारताला विजय मिळवता आला आहे, तर १२ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. चार सामने अनिर्णित राहिले. विशेष बाब म्हणजे, भारताने या मैदानावर शेवटचा विजय ऑगस्ट २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध १५१ धावांनी मिळवला होता.
लॉर्डस कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन:
भारत : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड : झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर





