IND vs ENG : इंग्लंडचा मास्टरप्लॅन! भारताविरुद्ध चौथ्या कसोटीसाठी संघात मोठा बदल

IND vs ENG England Announces Squad 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना सोमवारीच संपला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच मंगळवारी, पुढील कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने संघाची घोषणा करण्यात आली. भारताने संपूर्ण मालिकेसाठी आपला संघ आधीच जाहीर केला होता, पण इंग्लंडकडून प्रत्येक कसोटी सामन्यापूर्वी संघाची घोषणा केली जात आहे. दरम्यान, चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डने स्पष्ट केले आहे की त्यांच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. याबाबतची शक्यता आधीच व्यक्त केली जात होती.
शोएब बशीर मालिकेतून बाहेर –
लॉर्ड्स कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजला बाद करून इंग्लंडला विजय मिळवून देणारा शोएब बशीर आता मालिकेतून बाहेर पडला आहे. खरं तर, लॉर्ड्स कसोटीतच त्याला दुखापत झाली होती. चौथ्या डावात तो गोलंदाजीला येणार नव्हता, पण जेव्हा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला वाटलं की सामना हातून निसटू शकतो, तेव्हा त्याने दुखापतग्रस्त शोएब बशीरला गोलंदाजीला बोलावलं. बशीरनेही अपेक्षा पूर्ण केली आणि सिराजला बाद करून भारताचा शेवटचा गडी बाद करत इंग्लंडला विजय मिळवून दिला.
लियाम डॉसनचे आठ वर्षांनंतर संघात पुनरागमन –
Welcome, Daws! 👋
Spinner Liam Dawson joins our squad for the Fourth Test match against India 🏏
Full story 👇
— England Cricket (@englandcricket) July 15, 2025
दरम्यान, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) जाहीर केलं आहे की, शोएब बशीरच्या जागी लियाम डॉसनला संघात सामील करण्यात आलं आहे. लियाम डॉसन हे नाव भारतीय चाहत्यांना फारसं परिचित नसेल. पण त्याने आतापर्यंत तीन कसोटी सामन्यांत सात विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, सहा एकदिवसीय सामन्यांत पाच विकेट्स आणि १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ११ विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – Aiden Markram : ICC पुरस्कारावर एडेन मारक्रमची मोहर, WTC फायनलमधील कामगिरीला सलाम!
भारताविरुद्ध पदार्पण अन् भारताविरुद्धच पुनरागमन
खास गोष्ट म्हणजे, लियाम डॉसनने २०१६ मध्ये भारताविरुद्धच चेन्नईत कसोटी पदार्पण केलं होतं. त्याने २०१६ मध्ये पदार्पण केलं आणि जुलै २०१७ मध्ये त्याचा शेवटचा कसोटी सामना खेळला. आता तब्बल आठ वर्षांनंतर त्याचं कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. विशेष म्हणजे, ज्या भारतीय संघाविरुद्ध त्याने पदार्पण केलं, त्याच संघाविरुद्ध तो आता पुनरागमन करणार आहे. पण चौथ्या कसोटीसाठी अजून वेळ आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना २३ जुलैपासून मॅनचेस्टर येथे खेळवला जाईल.
हेही वाचा – IND vs ENG : अखेर रवींद्र जडेजाची झुंज ठरली अपयशी! चुरशीच्या सामन्यात इंग्लंडने मारली बाजी
भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ:
बेन स्टोक्स (कर्णधार), जो रूट, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, लियाम डॉसन, बेन डकेट, ऑली पोप, जेमी ओव्हरटन, जोश टंग, ख्रिस वोक्स.





