IND vs ENG : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन जाहीर, स्टोक्स-रूटवर मोठी जबाबदारी!

IND vs ENG England Announces Playing XI for 1st Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना येत्या २० जूनपासून हेडिंग्ले येथे होणार आहे. दोन्ही संघ पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेण्यास उत्सुक आहेत. यासाठी दोन्ही संघ सध्या मैदानावर घाम गाळत आहेत. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने दोन दिवसांपूर्वीच हेडिंग्ले येथील कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग जाहीर केली आहे.
या स्टार खेळाडूंना वगळले –
हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनच्या यादीवर नजर टाकली असता, अष्टपैलू जेमी ओव्हरटनचे नाव त्यात दिसत नाही. तसेच, आरसीबीकडून खेळणाऱ्या जेकेब बेथेललाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. गोलंदाजीची जबाबदारी ख्रिस वोक्स यांच्यावर असेल, तर फिरकी गोलंदाजीची धुरा शोएब बशीर सांभाळणार आहे. यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून जेमी स्मिथ खेळणार असून, त्याला यष्टिरक्षणासोबतच फलंदाजीमध्येही धावांचा पाऊस पाडावा लागेल.
Team news from Leeds ahead of a BIG week 📋
Ready to face @BCCI 👊
— England Cricket (@englandcricket) June 18, 2025
सलामीवीर म्हणून झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांची जोडी या मालिकेतही दिसणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर ओली पोप, तर दिग्गज जो रूट चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. मधल्या फळीत हॅरी ब्रूक आणि कर्णधार बेन स्टोक्स यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. कर्णधार बेन स्टोक्सला फलंदाजीबरोबरच गोलंदाजीचीही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. कारण गोलंदाजीत जोश टंग आणि ब्रायडन कार्से यांना अद्याप मोठ्या व्यासपीठावर स्वतःला सिद्ध करायचे आहे.
हेही वाचा –IND vs ENG : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील सामने मोफत लाईव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन :
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.





