IND vs ENG : क्रॉली-डकेट जोडीने भारताविरुद्ध रचला इतिहास, मोडला सर्वात मोठा विक्रम!
IND vs ENG Crawley-Duckett Partnerships Record : लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाची दुसरा डाव तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात 396 धावांवर संपुष्टात आली. यामुळे भारताने यजमान इंग्लंडला चौथ्या डावात 374 धावांचे आव्हान दिले आहे. इंग्लंडची सलामीवीर जोडी झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या गड्यासाठी 50 धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. यासह त्यांनी भारताविरुद्ध एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
भारताविरुद्ध सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावांच्या सलामी भागीदारीचा विक्रम –
झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावांच्या सलामी भागीदारीचा विक्रम नोंदवला आहे. या जोडीने आतापर्यंत भारताविरुद्ध 9 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावांची सलामी भागीदारी केली आहे. यामुळे त्यांनी वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनिज आणि डेसमंड हेन्स जोडीचा विक्रम मोडला, ज्यांनी भारताविरुद्ध 8 वेळा 50 पेक्षा जास्त धावांची सलामी भागीदारी केली होती.
भारताविरुद्ध सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावांच्या सलामी भागीदारी करणाऱ्या जोड्या :
- झॅक क्रॉली आणि बेन डकेट (इंग्लंड) – 9
- गॉर्डन ग्रीनिज आणि डेसमंड हेन्स (वेस्ट इंडिज) – 8
- ॲलिस्टर कूक आणि ॲन्ड्र्यू स्ट्रॉस (इंग्लंड) – 7
- मॅथ्यू हेडन आणि जस्टिन लँगर (ऑस्ट्रेलिया) – 7
- बिल लॉरी आणि बॉब सिम्पसन (ऑस्ट्रेलिया) – 7
हेही वाचा – IND vs ENG : सिराजची एक चूक अन् भारताची विजयाची आशा धोक्यात! नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
या मालिकेतील क्रॉली-डकेटची कामगिरी –
या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत बेन डकेट आणि झॅक क्रॉली यांनी भारताविरुद्ध केलेल्या कामगिरीचा आढावा घेतल्यास, डकेटने 9 डावांमध्ये 51.33 च्या सरासरीने एकूण 462 धावा केल्या. यामध्ये त्याने एक शतक आणि तीन अर्धशतके ठोकली. दुसरीकडे, क्रॉलीने 9 डावांमध्ये 32.22 च्या सरासरीने 290 धावा केल्या, ज्यात त्याला तीन अर्धशतके झळकावता आली.





