IND vs BAN Test Series : टीम इंडिया चेन्नईत दाखल, प्रशिक्षक गंभीरच्या नेतृत्वाखाली चेपॉकमध्ये सराव सुरू, कोहलीही मालिकेसाठी सज्ज..

Team India begins practice in Chennai – भारताचा विराट कोहली या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत वैयक्तिक कारणांमुळे खेळू शकला नाही. मात्र आता तो आगामी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान दोन कसोटीच्या मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून पहिली कसोटी चेन्नई येथे खेळविण्यात येणार आहे.
चालू वर्षातील ऑगस्टमध्ये श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान झालेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर पहिल्यांदाच भारतीय संघ कसोटीसाठी उतरणार आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे या मालिकेसाठी गौतम गंभीर यांच्यावर दबाव असण्याची शक्यता आहे.
एका महिन्याच्या विश्रांतीनंतर भारतीय संघाने बांगलादेश मालिकेसाठी तयारीला सुरुवात केली आहे. शुक्रवारी संघाच्या सर्व खेळाडूंनी सराव सत्रात भाग घेतला. यादरम्यान विराट कोहलीने तब्बल 45 मिनिटे फलंदाजीचा सराव केला. यावेळी नवे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल आणि सहायक प्रशिक्षक अभिषेक नायरही उपस्थित होते.भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही जोरदार गोलंदाजीचा सराव केला.
सर्व खेळाडू चेन्नईमध्ये दाखल
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, फलंदाज केएल राहुल, यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत गुरुवारीच चेन्नईला पोहोचले होते. शुक्रवारी सकाळीच विराट कोहली थेट लंडनवरून चेन्नई येथे पोहचला. त्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माचे देखील आगमन झाले.
The countdown starts as #TeamIndia begin their preps for an exciting home season.#INDvBAN pic.twitter.com/VlIvau5AfD
— BCCI (@BCCI) September 13, 2024
विरोधी संघ 15 सप्टेंबरला भारतात
गुरुवारी भारताबरोबरच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघाची घोषणा करण्यात आली होती. या संघाने नेतृत्व नजमूल हुसेन शांतोकडे असणार आहे. या स्पर्धेत बांगलादेश संघाने अनकॅप्ड झाकेर अली आनिकला संधी दिली आहे. बांगलादेश संघ 15 सप्टेंबर रोजी भारतात दाखल होणार आहे. या मालिकेनंतर बांगलादेश संघ तीन सामान्यांची टी-20 मालिका देखील खेळणार आहे.
विश्वकसोटी स्पर्धेत भारत अव्वल स्थानी
भारत सध्या विश्वकसोटी स्पर्धेत अव्वल स्थानी आहे. या मालिकेनंतर भारतीय संघाला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत कसोटी मालिका खेळायची आहे. विश्वकसोटी स्पर्धेत भारतीय संघ 68.52 टक्के गुणांसह पहिल्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया संघ 62.52 टक्के गुणांसह दुसऱ्या तर न्यूझीलंड 50.00 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. 19 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या मालिकेपूर्वी बांगलादेशने 45.83 गुणांसह चौथे स्थान राखले आहे. बंगालदेश संघाने पाकिस्तानला मायदेशात पराभूत करण्याची कामगिरी केली होती.





