पीएमकेच्या ताब्यावरून रस्सीखेच; माजी केंद्रीय मंत्री अंबुमणींची वडिलांवर सरशी

चेन्नई : पट्टाली मक्कल काची (पीएमके) या पक्षाच्या अध्यक्षपदी ऑगस्ट २०२६ पर्यंत माजी केंद्रीय मंत्री अंबुमणी हेच राहतील. त्याबाबीवर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे पक्षाच्या ताब्यावरून सुरू असलेल्या रस्सीखेचीत तूर्त तरी अंबुमणी यांची त्यांच्या वडिलांवर सरशी झाल्याचे दिसते. पीएमके हा तमिळनाडूतील महत्वाच्या पक्षांपैकी एक आहे. मात्र, त्या पक्षाचे संस्थापक एस. रामदास आणि त्यांचे पुत्र अंबुमणी यांच्यातील मतभेद विकोपाला गेले. त्यातून पीएमकेमध्ये पिता-पुत्राच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र गट अस्तित्वात आले.
त्यातून रामदास यांनी अंबुमणी यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवून ते पद स्वत:कडे घेतले. एवढेच नव्हे तर, नुकतीच रामदास यांनी पक्षविरोधी कारवाया करत असल्याबद्दल अंबुमणी यांची पीएमकेमधून थेट हकालपट्टी केली. मात्र, तो निर्णय पक्षाच्या घटनेनुसार अवैध असल्याची भूमिका अंबुमणी आणि त्यांच्या समर्थकांनी घेतली. आता निवडणूक आयोगाने अंबुमणी यांनाच पीएमकेचे अध्यक्ष म्हणून मान्यता दिल्याची ताजी घडामोड समोर आली. त्या पक्षाच्या कार्यकारिणीची महिनाभरापूर्वी बैठक झाली.
त्यामध्ये अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळाला वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली. ती मान्य केल्याचे निवडणूक आयोगाने जारी केलेले पत्र सोमवारी अंबुमणी यांना प्राप्त झाले. त्यामुळे पीएमकेच्या अध्यक्षपदी आणखी वर्षभर अंबुमणी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले. निवडणूक आयोगाने पीएमकेचे अध्यक्ष म्हणून अंबुमणी यांना मुदतवाढ दिल्याने त्यांच्या हकालपट्टीच्या कारवाईला कुठला अर्थ राहिलेला नाही. पीएमकेशी संबंधित सर्व अधिकार अंबुमणी यांच्याकडे असतील, असे त्यांच्या समर्थकांनी नमूद केले. आता रामदास कुठले पाऊल उचलणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.





