T20 World Cup 2024 (Warm-up match) : ऋषभ पंतनंतर हार्दिक पांड्याचं वादळ; भारतानं बांगलादेशसमोर ठेवलं मोठं लक्ष्य…

T20 World Cup 2024 (Bangladesh vs India Warm-Up Match) : भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध टी-20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. भारत आणि आयर्लंडचे संघ 5 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळत आहे.
न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 5 बाद 182 धावा केल्या असून बांगलादेशसमोर विजयासाठी 183 धावांचे आव्हान ठेवलं आहे. दरम्यान, नाणेफेकीच्या वेळी रोहित शर्माने सांगितले की, विराट कोहली शुक्रवारी न्यूयॉर्कला पोहोचला आहे. त्यामुळे या अनुभवी खेळाडूला विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे तो आजच्या सराव सामन्याचा भाग नाही.
Innings Break!#TeamIndia set a 🎯 of 1⃣8⃣3⃣ in the warmup match against Bangladesh 🙌
Over to our bowlers 💪
Scorecard ▶️ https://t.co/EmJRUPmJyn #T20WorldCup pic.twitter.com/6CEMDec2cZ
— BCCI (@BCCI) June 1, 2024
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मासोबत सलामीला आलेला संजू सॅमसन 6 चेंडूत 1 धावा काढून बाद झाला. टीम इंडियाला पहिला धक्का 11 धावांच्या स्कोअरवर बसला. मात्र, यानंतर रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्यात चांगली भागीदारी झाली. या दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. भारतीय कर्णधार रोहित शर्माने 19 चेंडूत 23 धावांचे योगदान दिले. भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने 32 चेंडूत 53 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार मारले. या झंझावाती खेळीनंतर ऋषभ पंत रिटायर्ड हर्ट झाला.
सूर्यकुमार यादवने 18 चेंडूत 31 धावांची चांगली खेळी केली. त्याचवेळी शिवम दुबे 16 चेंडूत 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये गेला. मात्र, टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याने स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन सादर केले. भारतीय संघाच्या या अष्टपैलू खेळाडूने 23 चेंडूत नाबाद 40 धावा केल्या. त्याने आपल्या स्फोटक खेळीत 4 षटकार आणि 2 चौकार लगावले.
बांगलादेशच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर शरीफुल इस्लाम व्यतिरिक्त महमुदुल्ला, मेहंदी हसन आणि तनवीर इस्लाम यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.





