Ind vs Ban 2nd Test : बांगलादेश विरुद्ध भारताचे पारडे जड, आजपासून दुसऱ्या कसोटीला सुरुवात….

कानपूर :- रविचंद्रन अश्विनचा अष्टपैलू खेळ, शुभमन गिल, ऋषभ पंत यांची शतकी खेळी, रवींद्र जडेजाचे दमदार अर्धशतक यांच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीमध्ये विजय मिळविला होता. मात्र, उद्यापासून सुरु होत असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीलढत जिंकून बांगलादेश संघाला क्लीन स्वीप देण्यासाठी भारताच्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दमदार खेळी करणे आवश्यक आहेत.
भारताने मायदेशात खेळताना जबरदस्त कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताने मायदेशात सलग १७ मालिका जिंकल्या असून १८ व्या मालिका विजयाच्या उंबरठ्यावर आहे. एकदिवसीय लढतीमध्ये ऋषभ पंतने दमदार पुनरागमन केले होते. त्यानंतर पंतला कसोटी मालिकेत देखील शानदार कामगिरी करून दाखविण्याची चांगली संधी आहे.
पहिल्या कसोटीमध्ये पंतचे एक वेगळे रूप पाहण्यास मिळाले. त्याने परिस्थितीच्या मागणीनुसार त्याने स्वतःतील आक्रमणाला संयमित स्वरूपात प्रस्तुत केले. त्यामुळे आक्रमण आणि संयम असा दोन्ही गोष्टींचा मिलाफ पंतच्या फलंदाजीत जाणवला. यामुळे तो आता अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
रोहित-विराटची कामगिरी…
पहिल्या कसोटीमध्ये बांगलादेशचे वेगवान गोलंदाज हसन महमूद आणि तस्किन अहमद यांनी अचूक गोलंदाजी केली. त्यामुळे भारताचे आघाडीचे फलंदाज कर्णधार रोहित शर्मा व रनमशीन विराट कोहली यांना बाद करण्यात दोघांना यश मिळाले. मात्र, भारताचे दोन्ही फलंदाज दुसऱ्या कसोटीत धावा करण्यासाठी उत्सुक असतील. बांगलादेश मालिकेपासून मोठ्या कसोटीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेपूर्वी दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा फलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेतील.
कानपूरचे ‘ग्रीन पार्क’
कानपूरच्या ग्रीन पार्क येथील खेळपट्टी ही फिरकीपटूना मदत करणारी आहे. सुरुवातीला वेगवान गोलंदाजाना देखील मदत मिळण्याची शक्यता आहे. जसाजसा खेळ पुढे जाईल, त्याप्रमाणे खेळ संथ होण्याची शक्यता आहे. यामुळे या लढतीत भारत दोन ऐवजी तीन फिरकी गोलंदाजांना घेऊन खेळण्याची शक्यता आहे. फलंदाजीला साहाय्य व्हावे, यासाठी कदाचित अक्षर पटेलला देखील अंतिम अकरामध्ये संधी मिळू शकते. त्यामुळे कुलदीपला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
२०२१ साली न्यूझीलंडबरोबर कानपूर येथे झालेल्या लढतीमध्ये अश्विन, जडेजा आणि अक्षर यांना संधी मिळाली होती. ही लढत पूर्ण पाच दिवस चालली होती त्यामुळे उद्यापासून सुरु होणारी कसोटी देखील पाच दिवस चालेल असा अंदाज आहे.
बांगलादेश संघात बदल होण्याची शक्यता…
पहिल्या कसोटीनंतर बांगलादेश अंतिम अकरा खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्याची शक्यता आहे. भारताची आघाडीची फळी बांगलादेशचा वेगवान माऱ्यासमोर अपयशी ठरली होती. त्यानंतर मात्र अश्विन आणि जडेजाने दमदार भागीदारी करताना बांगलादेशी गोलंदाजाच्या मर्यादा स्पष्ट केल्या होत्या. बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शाकिब-अल-हसनचा कदाचित हा शेवटचा सामना असू शकतो. मात्र चेन्नई येथील लढतीत त्याला दुखापत झाली होती. बांगलादेशकडे डावखुरा फिरकीपटू तैजुल इस्लामला संधी मिळण्याची दाट शक्यता असली तरी त्यांच्याकडे ऑफस्पिनर नईम हसनचा देखील पर्याय आहे.
हवामानाचे आव्हान…
गेल्या काही दिवसांपासून आर्द्रता वाढली असल्याने दोन्ही बाजूच्या खेळाडूंसमोर हवामानाचे मोठे आव्हान असणार आहे. भारतीय संघाने गुरुवारी देखील हलका सराव केला. पहिल्या आणि तिसऱ्या दिवशी पावसाची शक्याता वर्तविण्यात आली आहे. भारताने आतापर्यंत बांगलादेश बरोबरच्या एकाही कसोटी मालिकेत पराभव स्वीकारलेला नाही. त्यामुळे भारताला पराभूत करून बरोबरी साधण्यासाठी बांगलादेशच्या खेळाडूंना प्रयत्नाची शर्थ करावी लागणार आहे.
संभावित संघ :
भारत : रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (wk), ध्रुव जुरेल (wk), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.
बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो (C), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम (wk), शकीब अल हसन, लिटन कुमेर दास, मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्किन अहमद, सय्यद खालेद अहमद, जाकेर अली अनिक.





