IND vs BAN 1st Test (Day 3 Stumps) : तिसऱ्या दिवशीही भारताचे वर्चस्व, विजयापासून आणखी 6 विकेट्स दूर…

India vs Bangladesh 1st Test (Day 3 Stumps) : भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नई येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खराब प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ लवकर संपला. भारताने बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे लक्ष्य दिले होते. दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने 4 बाद 158 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती.
त्यावेळी बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतो 60 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 51 धावांवर खेळत होता, तर शाकिब अल हसन 14 चेंडूत 5 धावांवर नाबाद आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विनने 3 विकेट घेतल्या आहेत, तर एक विकेट जसप्रीत बुमराहच्या नावावर आहे. बांगलादेशला विजयासाठी अजून 357 धावांची गरज आहे. तर टीम इंडियाला आता हा सामना जिंकण्यासाठी आणखी 6 विकेट घ्यायच्या आहेत.
India 🆚 Bangladesh | 1st Test | Day 3
STUMPS | Bangladesh need 357 runsPC: BCCI#BCB #Cricket #INDvBAN #WTC25 pic.twitter.com/YdA92dFuY6
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 21, 2024
दिवसाची सुरुवात भारताच्या नावाने…
भारताने दुसऱ्या दिवशी 3 विकेट गमावून 81 धावा केल्या होत्या. शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्यातील भागीदारी चमकदारपणे पुढे गेली आणि दोघांनी शतके पूर्ण केली. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 167 धावांची महत्वपूर्ण भागीदारी झाली. यादरम्यान पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या गिलने दुसऱ्या डावात शानदार खेळी केली. त्यानं 176 चेंडूंचा सामना करत नाबाद 119 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 4 षटकार मारले. तर यष्टिरक्षक फलंदाज पंतने अप्रतिम कामगिरी केली. त्याने 128 चेंडूंचा सामना करत 109 धावा केल्या. पंतच्या खेळीत 13 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. पंत बाद झाल्यानंतर के. एल राहुल मैदानात आला. केएल राहुलने 19 चेंडूंचा सामना करताना 4 चौकारासह नाबाद 22 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाने दुसरा डाव 4 बाद 287 वर घोषित केला.
बांगलादेशच्या गोलंदाजांना दुसऱ्या डावात विशेष काही करता आले नाही. मात्र, मेहदी हसन मिराजने संघाकडून 2 बळी घेतले. त्याने 25 षटकात 103 धावा दिल्या. तस्किन अहमद आणि नाहिद राणा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. आता बांगलादेशसमोर डोंगरासारखे विशाल लक्ष्य आहे. पहिल्या डावात 149 धावांवर संघ सर्वबाद झाला होता.
बांगलादेशला मिळाले 515 धावांचे लक्ष्य…
बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 149 धावांवर आटोपल्याने भारताला 227 धावांची मोठी आघाडी मिळाली होती. तिसऱ्या दिवशी धावसंख्येमध्ये 287 धावांची भर पडल्यानंतर भारताची एकूण आघाडी 514 धावांची झाली. म्हणजेच बांगलादेशला 515 धावांचे लक्ष्य मिळाले.
भारत विजयापासून 6 विकेट दूर…
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली कारण पहिल्या विकेटसाठी सलामीवीर फलंदाजामध्ये 62 धावांची भागीदारी झाली. झाकीर हसनच्या रूपाने भारतीय संघाला पहिली विकेट मिळाली. झाकीरला वैयक्तिक 33 धावांवर जसप्रीत बुमराहनं यशस्वीकरवी झेलबाद केले. पुढच्या 3 विकेट फार कमी धावांच्या अंतरावर पडल्या. यामुळे संघाची स्थिती 4 विकेटवर 146 धावा अशी झाली होती. यात अश्विनचा मोठा वाटा होता. त्याने शादमान इस्लाम (35), मोमिनुल हक(13) आणि मुशफिकुर रहीमला (13) बाद करून बांगलादेशची स्थिती बिकट केली. पण बांगलादेशचा कर्णधार नजमुल शांतोनं अर्धशतक करताना संघाचा डाव सावरला.आता चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा बांगलादेशला पहिल्याच सत्रात गुंडाळून विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे.





