PM-XI vs IND (2-day Warm-up Match) : टीम इंडिया विजयी, Prime Ministers XI चा 6 विकेट्सने उडवला धुव्वा..

India vs Prime Minister XI 2-day Warm-up Match : कॅनबेरा येथे रविवारी झालेल्या सराव सामन्यात भारताने शानदार कामगिरी करताना पीएम इलेव्हन ऑस्ट्रेलियाच्या संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. भारताकडून शुबमन गिलने दमदार कामगिरी करत अर्धशतक झळकावले. तर वॉशिंग्टन सुंदरने 42 धावांची स्फोटक खेळी खेळली. सर्वाधिक 4 बळी घेत सामन्याचा खरा हिरो ठरलेल्या हर्षित राणाने भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली; ज्यामुळे दुसऱ्या कसोटीपूर्वी भारताचा आत्मविश्वास दुणावला आहे.
बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत 6 डिसेंबर पासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. दुसरा कसोटी सामना हा डे नाईट असून गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. त्या सामन्याच्या अनुषंगांने सराव व्हावा, या उद्देशाने 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान 2 दिवसीय सराव सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला, तर दुसऱ्या दिवसाच्या खेळात दोन्ही संघांनी 46-46 षटके खेळण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर हर्षित राणाने भेदक गोलंदाजी करत यजमान संघाला आपल्या पुढे गुडघे टेकायला भाग पाडले. भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियन पीएम इलेव्हन संघ 43.2 षटकात 240 धावांवरच गारद झाला. या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजीत हर्षित राणाने अप्रतिम कामगिरी करत एकूण 4 विकेट्स आपल्या नावावर केले.
राणाने 6 षटके गोलंदाजी करताना 44 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. यादरम्यान राणाने आपल्या शानदार गोलंदाजीने दोन फलंदाजांना त्रिफळचीत केले. राणाने जॅक क्लेटन, ऑलिव्हर डेव्हिस, जॅक एडवर्ड्स आणि सॅम हार्पर यांना तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला. टीम इंडियाने 46 षटके फलंदाजी करत 4 विकेट गमावून 257 धावा केल्या. भारताची धावसंख्या ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त होती. त्यामुळे टीम इंडियाला या सामन्यात विजयी घोषित करण्यात आले.
राणा व्यतिरिक्त आकाश दीपलाही दोन दिवसीय सराव सामन्यात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्म सिराज, प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांनीही प्रत्येकी एक विकेट्स घेतली. या सामन्यात रविचंद्रन अश्विनला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. अशाप्रकारे हर्षित राणा व्यतिरिक्त आकाश दीपने आपल्या धारदार गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
हर्षित-शुभमन सामन्याचे हिरो
टीम इंडियाच्या विजयात शुबमन गिल आणि हर्षित राणा या खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली. या दोन्ही खेळाडूंनी या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. सामन्याच्या पहिल्या डावात हर्षित राणाची गोलंदाजी अप्रतिम होती. सामन्याच्या पहिल्या डावात राणाने 6 षटकांत 44 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. यानंतर शुबमनने धावांचा पाठलाग करताना अर्धशतक झळकावले. या सामन्यात गिलने 62 चेंडूत 50 धावा केल्या. दुसरीकडे जैस्वालनेही 45 धावांची खेळी केली.
रोहित चौथ्या क्रमांकावर
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात सलामीला उतरला नाही. रोहित सलामी करेल आणि मधल्या फळीत के.एल. राहुलला खेळायला सांगेल असे वाटत होते. परंतू आजच्या सामन्यात राहुलला यशस्वी जैस्वालसोबत सलामीला उतरला. तर रोहित चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि 11 चेंडूत केवळ तीन धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियातील पहिल्याच सामन्यात रोहित शर्माने चाहत्यांची निराशा केली.





