Champions Trophy 2025 : भारताच्या दबावापुढे पाकिस्तान झुकला, हायब्रीड मॉडेलला होकार पण ICC समोर ठेवल्या 2 मोठ्या अटी…

Champions Trophy 2025 :- पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलवर होणार आहे. म्हणजेच पाकिस्तानबरोबरच या स्पर्धेचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार पीसीबीने शनिवारी आयसीसीच्या बैठकीत टीम इंडियाचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. मात्र, पाकिस्तानने आयसीसीसमोर काही अटी ठेवल्या आहेत. पीसीबीला आयसीसीकडून अधिक महसूल मिळावा व 2031 पर्यंत भारतातील सर्व प्रमुख स्पर्धाही हायब्रीड मॉडेलमध्ये घ्याव्यात असे त्यांनी म्हटले आहे.
या स्पर्धेसाठी भारताने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला होता. भारताला पाकिस्तानात यावेच लागेल यावर पाकिस्तान सुरुवातीला ठाम राहिला. पण, भारताच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अखेर हायब्रीड मॉडेलला होकार दिला आहे.
भारताचे सामने यूएईमध्ये होणार आहेत.
उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. जर भारतीय संघ उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत गेला तर हे सामने देखील यूएईमध्ये होणार आहेत. याआधी शुक्रवारी हायब्रीड मॉडेलबाबतची बैठक शनिवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.
जेव्हापासून पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली, तेव्हापासून भारतीय संघ पाकिस्तानला जाण्यास नकार देऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात होती. भारताने यापूर्वी 2023 मध्ये आशिया करंडक खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर आशिया करंडकमधील भारताचे सामने श्रीलंकेत झाले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) यापूर्वी सर्व भारतीय सामने लाहोरमध्ये आयोजित करण्याचा आणि सामन्यानंतर खेळाडूंना भारतात पाठवण्याचा प्रस्ताव दिला होता.
Champions Trophy 2025 : हायब्रीड मॉडेलसाठी PCBची तयारी सुरु, नक्वीनी घेतली UAEच्या अध्यक्षांची भेट…
भारत स्पर्धा आयोजित करण्यास तयार
भारत सरकारने तर बीसीसीआयला सांगितले आहे की, जर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद नाकारले तर ते भारतच आयोजित करण्यास तयार आहे. आयसीसीने भारताला यजमानपदाचे अधिकार दिल्यास सरकारकडून त्याला पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. एवढेच नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतात येणाऱ्या संघांच्या खेळाडूंनाही व्हिसा मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, अशी हमीही देण्यात आली आहे.





