IND vs AUS 5th Test: सिडनी कसोटीत भारताचा पराभव, 10 वर्षांनी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीही गमावली

IND vs AUS 5th Test: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील 5व्या व अंतिम कसोटी सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला आहे. दुसऱ्या डावाखेर भारताने 162 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने 4 विकेट्स गमावत 27 ओव्हरमध्येच लक्ष्य पूर्ण केले.
या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाच्या संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीही 3-1 ने जिंकली. ऑस्ट्रेलियाने 10 वर्षानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने 2014-15 मध्ये शेवटची ही ट्रॉफी जिंकली होती. या पराभवासोबतच आता भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीच्या अंतिम सामन्यात खेळण्याचे स्वप्न देखील भंगले आहे.
दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना भारताने 6 विकेट्स गमावत 141 धावा केल्या होत्या. या डावात रिषभ पंतने तुफानी फटकेबाजी करत 61 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघातील कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. भारताने दुसऱ्या डावात सर्वबाद 157 धावा करत ऑस्ट्रेलियाला 162 धावांचे आव्हान दिले होते.
A spirited effort from #TeamIndia but it’s Australia who win the 5th Test and seal the series 3-1
Scorecard – https://t.co/NFmndHLfxu#AUSvIND pic.twitter.com/xKCIrta5fB
— BCCI (@BCCI) January 5, 2025
दुसऱ्या डावात दुखापतीमुळे बुमराह गोलंदाजीला उतरला नाही. त्यामुळे भारतीय संघ पूर्णपणे मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर अवलंबून होता. प्रसिध कृष्णाने भेदक गोलंदाजी करत 3 विकेट्स देखील घेतल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाला रोखण्यात त्याला यश आले नाही. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 41 धावा, ट्रॅव्हिस हेडने नाबाद 34 धावा आणि ब्यू वेबस्टरने नाबाद 39 धावांची खेळी केली. तर भारताकडे प्रसिध कृष्णाने 3, मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली.
त्याआधी भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या होत्या. भारताकडून रिषभ पंतने 40, जडेजाने 26 आणि जसप्रीत बुमराहने 22 धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाकडून बोलंडनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतले होते.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 181 धावांपर्यंत मजल मारू शकला. दुसऱ्या डावातही भारतीय खेळाडूंना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. भारताचा दुसरा डाव अवघ्या 157 धावांवर कोलमडला. त्यानंतर 162 धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स राखून पूर्ण केले.





