IND vs AUS 4th Test : विराट मेलबर्न कसोटीपासून दमदार पुनरागमन करेल – कर्णधार शर्मा

IND vs AUS ( Melbourne, Boxing Day Test) : – पर्थ येथील कसोटीच्या दुसऱ्या डावात दमदार शतकी खेळी केल्यानंतर भारताचा अव्वल फलंदाज असलेल्या विराट कोहलीला विशेष कामगिरी करता आली नव्हती. त्याने पुढील तीन डावात केवळ ७, ११ व ३ अशा खेळी केल्या होत्या. मात्र विराट हा जगातील अव्वल फलंदाजापैकी एक आहे. त्यामुळे तो मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीपासून दमदार पुनरागमन करेल असा विश्वास भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला.
💬💬 Jasprit Bumrah’s confidence in his skillset, clarity of thought, and simple approach make it very easy for me.#TeamIndia captain Rohit Sharma shares his thoughts on captaining Jasprit Bumrah and his impact in the series so far. 👌#AUSvIND | @ImRo45 | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/WiXulJhqlj
— BCCI (@BCCI) December 24, 2024
मंगळवारी सरावानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माला विराट कोहलीच्या फॉर्मविषयी विचारणा करण्यात आली होती. त्या संदर्भात बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, विराट कोहली एक दर्जेदार खेळाडू आहे. त्याने यापूर्वी देखील अनेक नेत्रदीपक खेळी केल्या आहेत. त्यामुळे त्याला नक्कीच सर्व परिस्थितीचा अंदाज आहे. तो आधुनिक युगातील महान खेळाडू आहे. असेच खेळाडू स्वतःचा मार्ग स्वतः शोधत असतात, असे बोलताना रोहित म्हणाला.
यशस्वी जैस्वाल व लोकेश राहुल यांनी दमदार सलामी दिल्या आहेत. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माला ऍडलेड कसोटीमध्ये परातल्यानंतर सहाव्या स्थानावर फलंदाजी करावी लागली होती. ब्रिस्बेन कसोटीमध्ये देखील त्याने सहाव्या स्थानावर फलंदाजी केली होती. मात्र, आतापर्यंत रोहित शर्माच्या बॅटमधून मोठी खेळी निघाली नाही. दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे रोहितला पर्थ येथील कसोटीमध्ये सहभागी होता आले नव्हते. त्यापूर्वी न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या मायदेशातील मालिकेत देखील रोहित शर्माला धावा करता आल्या नव्हत्या. त्या मालिकेत भारताला ३-० असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवामुळेच भारताला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
मी एकदम फिट आहे
सध्या ही पाच सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील वर्षी लॉर्ड्सवर खेळवता यावा यासाठी भारताला शेवटच्या दोन कसोटींमध्ये विजय मिळवावा लागेल. रविवारी सराव सत्रादरम्यान रोहितला दुखापत झाली होती. फलंदाजीचा सराव सुरु असताना एक चेंडू रोहितच्या डाव्या गुडघ्यावर आदळला होता. मात्र, त्यानंतर काही काळ फलंदाजी केल्यानंतर त्याला वैद्यकीय मदतीची गरज लागली होती. मात्र त्याने स्वतः आपल्या तंदुरुस्तीबाबत चिंता दूर केली. मी बॉक्सिंग डे कसोटीसाठी पूर्णपणे तयार असल्याचे त्याने पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले.
तुम्ही काळजी करू नका…
कोण कुठे फलंदाजी करेल, याची काळजी तुम्ही करू नका. संघामातही काय सर्वोत्तम आहे, त्यानुसारच निर्णय घेण्यात येणार असल्याचे रोहितने पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. सध्याच्या घडीला यशस्वी आणि राहुल दोघे सलामीवीरांची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे कर्णधार रोहितला सहाव्या स्थानावर खेळावे लागत आहे. अनेक माजी क्रिकेटपटूनी रोहितला सलामीला खेळण्याचा सल्ला दिला होता. मात्र, अजूनही संघासाठी जे योग्य असले ते करणे आवश्यक असल्याची भूमिका कर्णधार रोहित शर्माने घेतली आहे.
युवा खेळाडूंना त्याची फलंदाजी समजते…
सध्या भारतीय संघात यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋषभ पंत सारखे युवा खेळाडू आहेत, जे आपली भूमिका यशस्वीपणे बजावत आहेत. यशस्वी जैस्वालने ऑस्ट्रेलियामध्ये दमदार कामगिरी केली आहे. कर्णधार रोहित म्हणाला, आम्हाला युवा खेळाडूंची मानसिकता बदलायची नाही. त्यांना इतरांपेक्षा आपल्या फलंदाजीतील बलस्थाने कोणती आहेत, हे चांगले माहिती आहे. त्यामुळे आम्ही त्यांना नक्कीच खुलेपणाने खेळण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे रोहित शर्मा म्हणाला.





