IND vs AUS 4th Test : सिडनी कसोटीत शुभमन गिलला मिळणार संधी, दोन अष्टपैलू खेळाडूंपैकी एकाचा होणार पत्ता कट…

सिडनी – दुसऱ्या डावात आघाडीच्या व वरिष्ठ खेळाडूंनी केलेल्या फलंदाजीतील हाराकीरीने भारतीय संघाला मेलबर्न कसोटीमध्ये 184 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल वगळता एकही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली सातत्याने अपयशी ठरत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीमध्ये शुभमन गिलचा समावेश करून फलंदाजी अजून सखोल करावीच लागणार आहे.
शुभमन गिलने ब्रिस्बेन कसोटीमध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र, मेलबर्न येथील खेळपट्टीचा अंदाज घेऊन संघ व्यवस्थापन व कर्णधार रोहित शर्मा यांनी शुभमन गिल ऐवजी संघात वॉशिंग्टन सुंदरचा समावेश केला होता. सुंदरने आपली भूमिका चोख बजावली असली तरी देखील शुभमन गिल हा सुंदर पेक्षा फलंदाजीमध्ये नक्कीच उजवा आहे. 2024 या वर्षांमध्ये शुभमन गिलने 866 धावा केल्या आहेत.
एका वर्षात भारतीय फलंदाजानी सर्वाधिक धावांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. यशस्वी जैस्वालने या वर्षी चौदाशेपेक्षा जास्त धावांचा रतीब घातला आहे. असे असले तरी शुभमन गिलला मेलबर्न कसोटीमध्ये संधी मिळणे अपेक्षित असताना देखील त्याला अंतिम 11 मध्ये निवडण्यात आले नाही, यामुळे नक्कीच युवा खेळाडूंची निराशा झाली असणार आहे.
यजमान संघ सध्या 2-1 असा मालिकेत आघाडीवर आहे. नवीन वर्षात 3 जानेवारीपासून सिडनी कसोटीला सुरुवात होणार आहे. सिडनी कसोटीमध्ये शुभमन गिलला अंतिम11मध्ये संधी मिळणे अपेक्षित आहे. पुढील वर्षी लॉर्ड्सवर होणाऱ्या डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होण्यासाठी भारताला सिडनी कसोटी कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय साकारावाच लागणार आहे.
वॉशिंग्टन सुंदरने 50 धावांची खेळी करून आपली योग्यता सिद्ध केली आणि शतकवीर नितीश कुमार रेड्डीसोबत शतकी भागीदारीही केली. जर त्याची गोलंदाजी धारदार असती तर त्याने नक्कीच जास्त षटके टाकली असती. सिडनीची खेळपट्टी ही पारंपारिक असून दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून फिरकीपटूना चांगली मदत मिळते. त्यामुळे रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर व तनुष कोटियन यांच्यापैकी दोघे खेळतील हे निश्चित आहे.
दिवसरात्र झालेल्या ऍडलेड कसोटीमध्ये आव्हानात्मक परिस्थितीमध्ये शुभमन गिलने 31 आणि 28 धावांची खेळी केली होती. यावेळी ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यावर रोहित आणि विराट कोहली पेक्षा तो अधिक चांगल्या प्रकारे खेळाला होता. मोहम्मद सिराजने मेलबर्न कसोटीत भन्नाट स्पेल टाकून पुढील कसोटीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. मात्र आकाशदीपने चांगली गोलंदाजी करून देखील त्याला केवळ 1 गडी बाद करता आला होता. त्यामुळे आकाशदीपला थांबवून शुभमन गिलचा समावेश करता येवू शकतो.
तिसरा पर्याय हा सर्वात गैरसोयीचा असला तरी देखील काळाची गरज देखील आहे. रोहित शर्माने पाच डावांमध्ये केवळ 31 धावांचे योगदान दिले आहे. त्याला गेल्या 14 डावांमध्ये केवळ 155 धावा करता आल्या आहेत. कर्णधार म्हणून रोहित शर्मा स्वेच्छेने पद सोडू शकतो व युवा शुभमन गिलला संधी देवू शकतो. मात्र, अशा परिस्थितीमध्ये लोकेश राहुलला सलामीवीराची भूमिका बजवावी लागणार आहे.





