IND vs AUS 4th Test : चौथ्या दिवसाचा खेळ संपला..! बोलँड-लियोनच्या भागीदारीचा भारताला फटका, कांगारूंची आघाडी 300 धावांच्या पार…

IND vs AUS 4th Test End of day 4 : मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी खेळली जात आहे. उभय संघांमधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील ही चौथी कसोटी आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 369 धावांवर संपला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रंगतदार स्थितीत आला आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पहायला मिळणार आहे. हा कसोटी सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण हा कसोटी सामना जिंकून भारत 2025 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवेल.
मेलबर्नमध्ये खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीचा चौथा दिवस संपला आहे. एकवेळ ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 173 धावांवर 9 विकेट गमावल्या होत्या आणि आजच भारत दुसऱ्या डावाला सुरुवात करेल असे वाटत होते, पण नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड यांनी दहाव्या विकेटसाठी 110 चेंडूत 55 धावांची नाबाद भागीदारी करून सामन्याचे चित्र पुन्हा पालटून टाकले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी 333 धावांची झाली आहे. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लियॉन 41 धावांवर तर स्कॉट बोलँड 10 धावांवर नाबाद माघारी परतले. दिवसाच्या शेवटच्या षटकात टीम इंडियालाही संधी मिळाली होती, पण बुमराहचा तो चेंडू नो बॉल ठरला. बुमराहच्या बॉलवर लियॉन स्लिपमध्ये राहुलकरवी झेलबाद झाला होता, पण नो बॉलमुळे लियॉनला जीवदान मिळाले.
That’s Stumps on Day 4
Australia reach 228/9 and lead by 333 runs
Updates ▶️ https://t.co/njfhCncRdL#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/Gw8NbCljL7
— BCCI (@BCCI) December 29, 2024
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी खराब होती. मार्नस लॅबुशेनने सर्वाधिक 70 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार पॅट कमिन्सने 41 धावांची खेळी केली. याशिवाय लियॉनने धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. यामध्ये सॅम कॉन्स्टास (8), ट्रॅव्हिस हेड (1), मिचेल मार्श (0), ॲलेक्स कॅरी (2) आणि मिचेल स्टार्क (5) यांचा समावेश आहे. उस्मान ख्वाजा 21 धावा करून तर स्टीव्ह स्मिथ 13 धावा करून बाद झाला. भारताकडून आतापर्यंत बुमराहने चार आणि सिराजने तीन विकेट्स घेतल्या आहेत तर रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव 369 धावांवर संपला. आज (रविवारी) टीम इंडियाने नऊ बाद 358 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि त्यांना 11 धावांची भर घालता आली. शेवटची विकेट नितीश रेड्डीच्या रूपानं पडली. तो 189 चेंडूंत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 114 धावा करून बाद झाला. त्याला स्टार्कच्या हाती नॅथन लिऑनने झेलबाद केले. नितीशने जवळपास 279 मिनिटे मैदानावर घालवली. त्याने सिराजसोबत शेवटच्या विकेटसाठी 36 चेंडूत 19 धावांची भागीदारी केली.
नितीशने नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या वॉशिंग्टन सुंदरसोबत आठव्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली. सुंदर आणि नितीश दोघांनी 150-150 चेंडू खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच एका संघातील आठव्या आणि नऊ क्रमांकाच्या फलंदाजांनी 150+ चेंडू खेळले आहेत. दोघांनी मिळून 285 चेंडू खेळले, म्हणजे सुमारे 48 षटके फलंदाजी केली. सुंदर 162 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 50 धावा करून बाद झाला.
तत्पूर्वी, यशस्वी जैस्वाल 82, रोहित शर्मा 03, केएल राहुल 24 , विराट कोहली 36, ऋषभ पंत 28 आणि रवींद्र जडेजा 17 धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप खातेही उघडू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स, स्कॉट बोलँड आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर ऑस्ट्रेलियाला एक विकेट धावबादच्या स्वरूपात मिळाली.





