IND vs AUS 4th Test | भारतीय गोलंदाजी पूर्णपणे बुमराहवर अवलंबून – चेतेश्वर पुजारा

IND vs AUS 4th Test (Melbourne) – बॉर्डर-गावस्कर मालिका बरोबरीत असली तरी देखील भारतीय गोलंदाजी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर पूर्णपणे अवलंबून आहे. त्याने लाल व गुलाबी चेंडूवर आतापर्यंत चांगली कामगिरी केली असली तरी देखील त्याला इतर गोलंदाजाकडून म्हणावी तशी साथ मिळालेली नाही. पुढील दोन सामने मेलबर्न व सिडनी येथे होणार आहेत. मात्र भारतीय गोलंदाजी कसोटी सामन्यात २० बळी घेण्याएवढी मजबूत नाही, त्यामुळे आगामी दोन सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी हीच सर्वात मोठी चिंतेची बाब असल्याचे अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा म्हणाला.
चेतेश्वर पुजाराने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, भारताचे आघाडीचे फलंदाज अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नसले तरी त्यांनी थोडी चांगली फलंदाजी केली आहे. रवींद्र जडेजा, नितीशकुमार रेड्डी सारखे मधल्या फळीतील व बुमराह व आकाशदीप सारखे गोलंदाज आपल्या बॅटने देखील योगदान देत आहेत. मात्र गोलंदाजी अजूनही कमकुवत असल्यासारखीच दिसून येत आहे.
गोलंदाजीबाबत चिंता व्यक्त करताना तो म्हणाला, गोलंदाजी कमकुवत असेल तर अंतिम संघ कसा असेल, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नितीशकुमार रेड्डी, रवींद्र जडेजाला तुम्ही संघाबाहेर ठेवू शकत नाही, मग संघाचे संयोजन कसे असणार आहे ? असा सवाल देखील त्याने उपस्थित केला. रवींद्र जडेजा व नितीशकुमार रेडडी हे दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. आतापर्यंत संधी मिळल्यानंतर दोघीनींही फलंदाजीतील आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. मात्र ते दोघेही पूर्णवेळ गोलंदाज नाहीत. कामचलावू गोलंदाज म्हणून त्यांचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे ते चौथ्या व पाचव्या गोलंदाजाची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडण्यास समर्थ नाहीत, असे पुजाराचे मत आहे.
गोलंदाजीत सुधारणा करावी लागेल
अश्विन निवृत्त झाला आहे. जडेजा आणि रेड्डी याना गोलंदाजीत चांगली कामगिरी करता आलेली नाही. मात्र तीनही वेगवान गोलंदाज आपली भूमिका चांगल्या प्रकारे निभावत आहेत. जर कसोटी सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला प्रतिस्पर्ध्यांचे २० बळी टिपावेच लागणार आहेत. त्यामुळे या विभागामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, मात्र ती सुधारणा कशाप्रकारे करता येईल हाच मोठा प्रश्न असल्याचे चेतेश्वर पुजारा बोलताना म्हणाला.
IND vs AUS 4th Test | मेलबर्नच्या चाहत्यांना ‘विराट कोहली’कडून धमाकेदार खेळीची अपेक्षा…
मुंबईचा तनुश कोटियन भारतीय संघात
भारताच्या अव्वल फिरकी गोलंदाज असलेल्या रविचंद्रन अश्विनने बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या मध्यातच निवृत्ती घेतली. त्यामुळे मुंबईच्या तनुश कोटियनची निवड भारतीय संघात करण्यात आली आहे. २६ वर्षीय तनुश सध्या अहमदाबादमध्ये मुंबईकडून विजय हजारे करंडक खेळत आहे. यापूर्वी तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघाचा सदस्य होता.
कोटियनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३३ सामन्यांमध्ये १०१ बळी टिपले आहेत. त्याने फलंदाजीत २ शतके व १३ अर्धशतकांसह १५२५ धावा केल्या आहेत. याचबरोबरीने लिस्ट ए मध्ये देखील २० सामन्यात २० बळी व ९० धावा तर टी-२० मध्ये ६.३९ च्या इकोनॉमीने ३३ बळी टिपताना ८७ धावा केल्या आहेत. विजय हजारे करंडक स्पर्धेत त्याने हैदराबाद विरुद्ध ३९ धावा करताना २ बळी टिपले आहेत.





